विक्रम गोखले यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विक्रम गोखलेंच्या निधनानंतर मराठी पासून बॉलीवुड्पर्यंत चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांना भावुक होत श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची हळहळ व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर नाना यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नाना यांनी लिहिले आहे, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….” या दोघांचा ‘नटसम्राट’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
विक्रम गोखलेंच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि, “खरंच एक चांगला माणूस आणि एक महान कलाकार गेला, मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी अशी दोन्ही माध्यमं त्यांनी गाजवली होती. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतूक झाले आहे. मी त्यांच्याबरोबर तीन, चार चित्रपटात काम केलं होतं. इतका गुणी कलावंत, सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस, लहान मोठ्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देणे, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणे. एखादा कलाकार अडखळत असेल तर त्यांनी कायमच त्याला मदत केली आहे. एका छान कलाकाराला आपण मुकलेलो आहोत.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, “ज्याची भीती होती तेच झालं. त्याच्या आजाराविषयी मला माहिती होतं. मला वाटलं होतं त्यातून तो बरा होईल, पुन्हा आम्ही भेटू. तो माझा खूप जवळचा मित्र होता. त्याला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम ‘बॅरीस्टर’ या नाटकाच्या माध्यमातून बघता आला.”
लोकप्रिय अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमोल त्यांच्या आठवणीत भावुक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!’ अशा आशयाची कविता लिहीत त्यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे.
विक्रम गोखलेंबद्दल लिहिताना अभिनेत्री क्रांती रेडकरने लिहिलंय कि, ”बाय बाय विक्रम काका. तू आम्हाला सोडून गेलास याचे मला वाईट वाटते पण माझे मन कृतज्ञतेने भरले आहे की आपण भेटलो, एकत्र काम केले, तू प्रत्येक बाबतीत अतुलनीय आहेस. परंतु…. आज मला एवढं दुःख होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे संकटात माझ्या आणि समीरच्या पाठीशी उभा राहिलेला एक मोठा ताकदीचा खांब मी गमावला आहे. विक्रम काका नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद.”
अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर शरद पोंक्षे म्हणाले की, ‘विक्रम गोखले आमच्या अनेक पिढ्यांचे गुरू आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही अभिनय शिकलो, अनेक कलावंत तयार झाले. गेले चार दिवस त्यांच्या निधनाच्या बातमीचा सोशल मीडियावर सर्वांनी खेळखंडोबा केला होता. धड बातमी नसताना सगळेजण श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. ज्या कुणी श्रद्धांजली वाहिली, घाणेरड्या शब्दांत ज्यांनी हे मांडलं त्या सगळ्यांचा जीव आज शांत झाला असेल.’
विक्रम गोखलेंच्या आठवणीत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी भावुक होत म्हणाल्या कि, ‘आमची पहिली भेट पुण्यात झाली होती. नंतर जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा आमची ओळख वाढली. आम्ही एकत्र फार काम केलं नाही पण त्यांच्या अभिनयाची पद्धत मला खूप आवडायची. नेहमी भेटल्यानंतर ते मला म्हणायचे की रोहिणी आपण एकमेकांची नावं सजेस्ट करायची हा भूमिकेसाठी. मन लावून काम करायचं हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यामुळे ते आज यशाच्या शिखरावर होते.’
अभिनेत्री अश्विनी भावे हिने विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहत म्हटलं आहे कि, ”आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सह्रीदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे ,जे कधीही भरून काढता येणार नाही.त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील!”
विक्रम गोखलेंच्या निधनानंतर अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले आहे कि, “विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. भूल भुलैया, मिशन मंगल यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. ओम शांती.”