शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित ; राज्यात दोन हजारपेक्षा अधिक वाहने धोकादायक असल्याचे उघड

राज्यात शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. दोन हजारांहून अधिक वाहनांची रचना नियमांना झुगारून करण्यात आली असून बहुतांश वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव दिसतो. वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक बहुतांश ठिकाणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

करोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता पूर्ववत सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची पुन्हा शालेय बस आणि व्हॅनमधून  वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अनेक शालेय व्हॅन आणि बस नियमावलीमधील तरतुदीचा भंग करून विद्यार्थ्यांची धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. अनेक अटींचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आरटीओंकडे आल्या होत्या. त्यानंतर राज्यातील सर्व आरटीओंनी २६ ते ३१ जुलैपर्यंत विशेष मोहीम हाती घेऊन शालेय बस आणि व्हॅनवर तसेच चालक, मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.  मोहिमेत राज्यात एकूण १ हजार ६६१ परवानाधारक वाहने आणि ५९२ विनापरवानाधारक वाहने अशा एकूण २ हजार २५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.  ही मोहीम पुढे सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

त्रुटी कोणत्या?

परवाना नसलेली वाहने, वेग नियंत्रणाबाहेर, आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, वैध विमा प्रमाणपत्र नसणे, वाहनात परिचारक नसणे, अग्निशमन सुविधा नसणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत.

विशेष मोहिमेमुळे..

नियम मोडणाऱ्या शालेय बस आणि व्हॅनचालक, मालकांवर परिवहन आयुक्त कार्यालयाच्या आदेशानंतर आरटीओकडून २६ जुलैपासून विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली. सहा दिवस चाललेल्या या मोहिमेत दोन हजारपेक्षा जास्त वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.

कुठेकुठे? राज्यात सर्वाधिक कारवाई पनवेल, पेण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या विभागात; पुणे, सोलापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड, अकलूज या विभागात तर मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, वाशी, वसई या भागांत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.