सांगली : बत्तीस शिराळा येथे प्रतिकात्मक नागपूजा करून नागपंचमी साजरी
जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा येथे प्रतिकात्मक नागपूजा करून आज (मंगळवार) नागपंचमी साधेपणाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने ५० पेक्षा अधिक मंडळाकडून वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुका काढण्यात आल्या.जिवंत नागपूजेसाठी शिराळा येथे २००२ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्प हाताळणी, प्रदर्शन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे प्रतिकात्मक नागपूजा करून यंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिकात्मक नागपूजा आटोपल्यानंतर देवीची पालखी काढण्यात आली. यानंतर मंडळाच्या सार्वजनिक मिरवणुकांना प्रारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरीत ३ लाख घरांवर फडकणार तिरंगा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तीन लाख घरांवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या शहरवासियांना मोफत ध्वज वाटप करण्यात येणार आहे. शहरवासीयांसह शैक्षणिक, सामाजिक संस्था, सोसायट्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
‘मी 100 वर्षांची होईपर्यंत काम करेन’; आलियाचा वर्क लाईफ फंडा चर्चेत
आलिया भट्ट ही अभिनेत्री सध्या अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. आलियाने आई होण्याची बातमी शेअर केल्यापासून तिच्याबद्दल वारंवार वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तिच्या कामाऐवजी तिच्या प्रेग्नंन्सीबद्दल वेगवेगळे नवे अपडेट रोज समोर येत आहेत. यातच आलियाने वर्क लाईफबद्दल एक नवं वक्तव्य केलं ज्याने ती बरीच चर्चेत येत आहे.आलिया सध्या तिच्या डार्लिंग्ज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया प्रेग्नन्ट असतानाही कामाला तितकंच महत्त्व देऊन कामाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. प्रमोशनदरम्यान तिला वर्क लाईफबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ती सांगते, “जर तुम्ही फिट आणि तंदुरुस्त असाल, स्वतःची नीट काळजी घेत असाल तर तुम्हाला अराम करायची गरज नाही. माझं काम माझ्यासाठी समाधान देणारी गोष्ट आहे. ते माझं पॅशन आहे. माझा आत्मा आणि हृदय जिवंत ठेवायला ते मदत करतात. मी तर वयाच्या शंभरी पर्यंतही काम करू शकते.”
गृहमंत्री अमित शाह यांचं CAA पुन्हा आणण्याचे स्पष्ट संकेत
भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशात बराच गदारोळ झाला होता. देशातील अनेक राज्यात याविरोधात आंदोलने झाली. अखेर भाजपने माघार घेत हा कायदा गुंडाळला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हा कायदा लागू करण्याचे संकेत भाजप नेतृत्वाने दिले आहेत. पश्चिम बंगालचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्याची विनंती केली. यावर शाह यांनी त्यांना आश्वासन दिले की, कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचे नियम तयार केले जातील. त्यामुळे पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती देशात निर्माण होऊ शकते.
Asia Cup 2022 च्या वेळापत्रकाची घोषणा, या दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
आशिया कप 2022 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होईल, तर 11 सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवली जाईल. यावेळचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने यंदाचा आशिया कप टीम इंडियासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.28 ऑगस्टला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये महामुकाबला होईल. मागच्या वर्षी याच मैदानात दोन्ही देशांमध्ये टी-20 वर्ल्ड कपची मॅच झाली होती, या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट 100 कोटींच्या निधीची मदत
काही महिन्यांपूर्वी राज्यातील लाल परी अशी ओळख असलेल्या एसटीला भलामोठा ब्रेक लागला होता. एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास महिनाभर आंदोलन चालले होते. या दरम्यानच्या काळात जिल्हे आणि गावं यांचा संपर्कच जणू काही तुटला होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामध्ये पगारवाढीच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करण्यात आल्या होत्या. पण या संपामुळे एसटी महामंडळाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेला मोठा झटका, वैभव खेडेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेसाठी हा खूप मोठा फटका मानला जातोय. वैभव खेडेकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकाराचे आरोप केले जात होते. खेडेकर यांनी सरकारी वाहनांच्या नावाने खासगी गाड्यांसाठी लाखो रुपयांचे डिझेल खरेदी केले, असा आरोप करण्यात येत होते. अखेर याच आरोपांप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
ना शिंदे गट, ना भाजप, औरंगाबादच्या पठ्ठ्याने स्वतः ला घोषित केले सामाजिक न्यायमंत्री!
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही त्यामुळे कुणाचीही मंत्रिपदी निवड झालेली नाही. मात्र, औरंगाबादमध्ये एका पठ्ठ्याने स्वत: सामाजिक न्यायमंत्री घोषित केलं आहे. त्याच्या या प्रतापमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद शहरातील एका पठ्याने स्वतःला राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून घोषित केले आहे. यासंबंधीचे बॅनर तयार करून हा पठ्ठ्या स्वतःच्या गाडीवर लावून फिरत आहे. भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे. त्याने लावलेले गाडीवरील बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
‘संजय राऊत 4 वर्ष तुरुंगातच राहणार, म्हणूनच उद्धव ठाकरे..”; बंडखोर आमदाराचा खळबळजनक दावा
शिवसेनेतील 40 आणि अपक्ष अशा एकूण 50 आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. आता यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनाही सवाल केला. काल संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले होते, मात्र यापूर्वी अडसूळ, सरनाईक यांच्या घरी का नाही गेले? असं त्यांनी विचारलं. शिरसाट यांनी दावा केला की, संजय राऊत चार वर्ष जेलमध्ये राहतील. ते लवकर बाहेर येणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे भेटीसाठी गेले होते.
काही तासांतच देशात Monkeypox रुग्णांची संख्या दुप्पट
कोरोनानंतर आता देशात मंकीपॉक्सही थैमान घालतो की काय अशीच भीती आता निर्माण झाली आहे. कारण अवघ्या 24 तासांत देशातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. केरळ आणि दिल्लीत मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे.
उड्डाणावेळीच अचानक इंडिगो विमानाखाली घुसली कार, दिल्ली विमानतळावरील घटना
दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर मंगळवारी सकाळी मोठा अपघात होता होता टळला. गोफर्स्ट एअरलाईन्सच्या ग्राऊंड स्टाफची एक कार थेट विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसली. क्रू मेंबर्स आणि पायलट यांना एअरपोर्टमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी विमानतळावर असलेली कार टर्मिनल 2 वर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाला धडकली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या घटनेनं विमानतळावर एकच गोंधळ उडाला. आज सकाळी इंडिगो एअरलाईनचं विमान ए३२० निओ उड्डाणासाठी सज्ज होतं. दरम्यान अचानक गो फर्स्ट एअरलाईन्सची कार थेट उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसली. विमान उभं असल्यामुळं मोठा अनर्थ होता होता टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेनं विमानतळावर एकच खळबळ उडाली.
Commonwealth Games मध्ये भारताने इतिहास घडवला, लॉन बॉल्समध्ये पहिल्यांदाच गोल्ड
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने इतिहास घडवला आहे. भारताला पहिल्यांदाच लॉन बॉल्समध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे. भारताच्या लव्हली, पिंकी, नयनमोनी आणि रुपा यांनी दक्षिण आफ्रिकेचा महिला फोर फायनलमध्ये 17-10 ने पराभव केला. लॉन बॉल्स या क्रीडा प्रकारामध्ये दक्षिण आफ्रिकेने 3 वेळा कॉमनवेल्थ खेळात गोल्ड मेडल पटकावलं होतं. याच दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
SD Social Media
9850 60 3590