राज्य अजित पवार चालवतायेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे ?

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतो आहे. राज्य अजित पवार चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजप समोर गुडघे टेका
“प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही,” असेही निलेश राणे म्हणाले.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.