आज दि.७ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मेधा पाटकरांविरोधात ED ची कारवाई

नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिलाय. गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केलीय. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ईडी’च्या कारवाया
अन्यायकारक : शरद पवार

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचे पवार यांनी मोदींना सांगितल़े मोदी-पवार भेटीमुळे दिल्लीसह महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते. मात्र, ‘राज्यातील सरकार भक्कम असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतील’, असा निर्वाळा पवार यांनी दिला.

हिजाबप्रश्नी रस्त्यावर उतरून
सशस्त्र प्रतिहल्ल्याचे आवाहन

अल् कायदा या दहशतवादी संघटनेच्या अस-सहाब मीडिया या मुखपत्राद्वारे अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी याची नऊ मिनिटांची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात त्याने भारतात हिजाबप्रश्नी सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. त्याने भारतीय उपखंडातील मुस्लिमांनी एकत्र येऊन इस्लामवर होत असलेल्या हल्ल्यांवर बौद्धिक, तार्किक, प्रसारमाध्यमांद्वारे किंवा रस्त्यावर उतरून सशस्त्र प्रतिहल्ल्याचे आवाहन केले आहे. भारतातील ताज्या घडामोडींवर जवाहिरीने या चित्रफितीद्वारे केलेले भाष्य पाहता, तो जिवंत असल्याचा पुरावाच मानला जात आहे

एअर इंडियाची दिल्ली ते
मॉस्कोचे विमानसेवा रद्द

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्कोचे विमानसेवा रद्द केली आहे. एअर इंडियाची विमाने आठवड्यातून दोनदा दिल्लीहून मॉस्कोला जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा संरक्षण न मिळाल्याने एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडे उड्डाण करणाऱ्या विमानांना जास्त धोका आहे, त्यामुळे विमानांना विमा संरक्षण मिळत नाही.

चीनच्या हॅकर्सचा वीज केंद्रांच्या
ग्रीडवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न

भारत चीन सीमेवरील घडामोडी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत, चीन विविध प्रकारे सीमेवरील तणाव कसा कायम राहील याच्या प्रयत्नात आहे. लडाख परिसरात सीमेवरील चीनी सैन्याच्या उपस्थितीमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागेल या हेतूने भारतानेही सैन्य सीमेवर गेली दोन वर्ष सज्ज ठेवलं आहे. चीनच्या कुरापतीमध्ये एका प्रकाराची भर पडली आहे . चीनच्या हॅकर्सनी सीमेवरील वीज केंद्रांच्या ग्रीडवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी
कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलचा अल्टिमेटम!

२२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील, यांच्यावर कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. कालच न्यायालयाने सांगितलेलं आहे की, जे कामगार न्यायालायाने दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. ” अशा शब्दांमध्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला.

नाशिकमध्ये बालभारतीच्या कार्यालयात
दारूचे धडे, अधिकाऱ्यांची तर्राट पार्टी

नाशिकच्या बालभारती कार्यालयातील भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हे कार्यालयीन कामकाज सुरू असताना नशापान करून काम करत असल्याचे आढळून आले. सदर अधिकार्‍याचा हा आधुनिक शिक्षण कार्यक्रम दिवसाढवळ्या बालभारती पुस्तकांच्या गोदामात सुरु होता. व्यवस्थापक डामसे यांनी मारी बिस्किटसोबत चहा नव्हे तर दारू पिताना आढळून आले. या अधिकाऱ्याना दारू सेवन करताना शिवसैनिकांनी या रंगेल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

पुणे शहर अध्यक्षपदावरून
वसंत मोरेंची उचलबांगडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला. मात्र, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

कुत्र्यांच्या भांडणात चुलीवरचे पातले खाली पडले, गरम पाण्यात दोन बहिणी भाजल्या, नाशकातील घटना

भटक्या कुत्र्यांच्या भांडणात चुलीवर ठेवलेले पातल्यातील गरम पाणी अंगावर पडल्यामुळे दोन चिमुरड्या मुली भाजल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या दोन्ही बहिणींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील गैरने गावापासून काही अंतरावर असलेल्या देवरगाव येथे ही घटना घडली. रुपाली कराटे आणि पल्लवी कराटे असं भाजलेल्या मुलींची नाव आहे. सकाळी अंगणामध्ये चुलीवर आंघोळीसाठी पाणी ठेवले होते. अंगणातच या दोन चिमुड्या झोपलेल्या होता. तिथे अचानक दोन भटके कुत्रे आली. दोघांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला, 60 लाख लोकांना मिळणार मोठा फायदा

आधार कार्ड हे सध्या भारतीयाचं महत्त्वाचं ओळखपत्र झालं आहे. पॅन कार्डसोबतच कित्येक सरकारी योजना या आधार कार्डसोबत लिंक करण्यात आल्या आहेत. यानंतर आता केंद्र सरकारने जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे. यामुळे शासकीय योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे.

बॉलिवूडवर पुन्हा शोककळा, प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचं निधन

संगीत क्षेत्रातून पुन्हा एकदा दुःखद माहिती समोर आली आहे. ‘सावन को आने दो’, ‘कजरे की बाती’, ‘आँखों में बस हो तुम’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ आणि ‘रानी चेहरे वाले’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी लिहिणाऱ्या गीतकार माया गोविंद यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 80 वर्षीय माया गोविंद यांनी आज राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत; रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमैयांवर टिका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची
नोंद, 12 बॉलमध्ये 3 धावाच

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात कोलकाताने मुंबईवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईने या मॅचमध्ये बॅटिंगने निराशा केली. कॅप्टन रोहित शर्माकडून या सामन्यात बॅटिंगने अनेक अपेक्षा होत्या. मात्र रोहितने अवघ्या 12 बॉलमध्ये 3 धावाच केल्या. या खेळीसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कॅप्टन रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.