केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत सांगितलं की, गेल्या पाच वर्षांत खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील 34 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 ते या वर्षी मार्चपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 4 काश्मिरी पंडित आणि 10 अन्य हिंदूंची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा इतर राज्यांतील कामगार आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. सोमवारी काश्मिरी पंडित बाल कृष्ण यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर २४ तासांत पंजाब आणि बिहारमधील ४ मजुरांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घालून जखमी केलं.
दुसर्या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, 2018 पासून जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार घुसखोरीमध्ये सातत्याने घट झाली आहे. इथे 2017 मध्ये 136 वेळा, 2018 मध्ये 143 वेळा, 2019 मध्ये 138 वेळा, 2020 मध्ये 51 वेळा आणि 2021 मध्ये 34 वेळा घुसखोरी झाली होती. ते म्हणाले की, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर बहु-स्तरीय तैनाती, सीमेवर कुंपण, गुप्तचर आणि ऑपरेशनल समन्वय सुधारणे, सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रे प्रदान करणे आणि घुसखोरांविरुद्ध सक्रिय कारवाई करणे यांचा समावेश आहे.