समग्र सामाजिक क्रांतीचे अग्रदुत क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या लेखणीतून साकारलेले तृतीय रत्न नाटक नाट्यसृष्टीच्या आजपर्यंतच्या इतिहासात रंगमंचावर आणण्याचे धाडस करण्यात आले. हे धाडस परिवर्तनाच्या प्रबोधन चळवळीत सदैव सक्रिय असलेले सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटक प्रथमच अनिरुद्ध वनकरांच्या निर्मितीत व दिग्दर्शनामध्ये 10 एप्रिलपासून पुणे येथे पहिला प्रयोग सादर होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सादरीकरणाला सुरुवात होत आहे. 1855 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला असता ते त्यावेळी सादर होऊ देण्यात आले नाही. त्यानंतर प्रथमच हे नाटक सादर केले जाणार आहे. अशी माहिती अभिनेते व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी दिली.
तृतीय रत्न नाटकाची नागपूर येथे मागील 15 दिवसांपासून जोरदार तालीम सुरू आहे. या नाटकाची निर्मिती चंद्रपूरच्या लोकजागृती या संस्थेची आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अनिरुद्ध वनकर, प्रा. डॉ. शेखर डोंगरे, संजीव रामटेके, मंगेश मेश्राम, नागसेन गायकवाड, अरविंद खंदारे, रूपेश मेश्राम, आकाश डांगे, चंद्रकांत तोरणे, करण गुडेवार, अविनाश बोना, अभिनेत्री दीपाली बडेकर, शुभांगी राऊत, रूपाली खोब्रागडे, रंजू वैद्य यांच्यासह इतरही कलावंत नाटकात भूमिका साकारणार आहेत.
सेट, कास्ट्यूम व क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रा. संगीता टिपले संपूर्ण जबाबदारी पार पडणार आहेत. प्रकाश योजना प्रा. शिवप्रसाद गौड नवी दिल्ली यांचे असणार आहे. नाटक म्हणजे मनोरंजन, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात असले तरी महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ आणि तेव्हाचे समाजमन लक्षात घेता नाटकातून होणाऱ्या प्रबोधनाला महत्त्व होते. वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रबोधनाची कास धरत समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक बांधले. याच नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला असे म्हटले जाते. महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. कलेचा कृतिपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो.