शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले, असा टोलाही महाजन यांनी लगावला. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.
नाशिकचं प्रभारीपद मिळाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता राऊत नाव घेतील. ते भंपक विधाने करत आहेत. आरोप करतायत तर पुरावे द्या ना, असं सांगतानाच राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. रश्मी शुक्लाप्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे, असंही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. त्यावर त्यांनी टीका केली. राज्यपालांची नेमणूक काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही. आमच्या मना सारख करा नाहीतर राज्यपालांना हटवा अशी त्यांची भूमिका आहे. शासनाच्या, पोलीस खात्याच्या बदल्यांमध्येही हाच प्रकार सुरू आहे. मनासारखं करा नाही तर हटवा, हे धोरण राबवले जात आहे. पण राज्यपालांचं पद संवैधानिक आहे. कोणी कितीही म्हटलं तरी आम्ही फारसा लक्ष देत नाही, असं ते म्हणाले.
नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. दाऊदच्या हस्तकाकडून नगण्य किमतीत त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. हसीना पारकरला पैसे दिले आहेत. तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार. मग संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला? हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यांना जनाची मनाची काहीच राहिली नाही. कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देणारी शिवसेना. यापेक्षा शिवसेनेचे दुर्दैव काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.