सावळय़ा विठुरायाच्या चरणी भक्तांनी सढळ हाताने दान दिले. यंदाच्या आषाढी वारी काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत जवळपास ५ कोटी ७० लाख जमा झाले. श्री विठ्ठलाच्या चरणावर भाविकांनी ४३ लाख तर रुक्मिणीमातेच्या चरणावर १० लाख दान दिले. २०१९ च्या आषाढी वारीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ९७ लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
यंदा जवळपास १२ ते १३ लाख भाविकांनी पंढरीची आषाढी वारी पोहोचती केली. या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. वारी काळात देणगी स्वरुपात २ कोटी ९ लाख रुपये तर हुंडी पेटीत ९१ लाख ३४ हजार रुपये जमा झाले. छायाचित्रे विक्रीतून २ लाख २९ हजार रुपये तर नवीन भक्त निवास येथून १४ लाख ५७ हजार रुपये इतके उत्पन्न समितीला मिळाले. तर नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील विजयकुमार उतरवार या भाविकाने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला १ कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. समितीला सोने भेट १ कोटी ६ लाख तर चांदी ८२ हजार १६४ रुपयाच्या माध्यमातून भेट स्वरूपात मिळाली आहे.
याच बरोबरीने मंदिर समितीच्या उत्पन्नात काही बाबींवर घट झालेली दिसून आली. यंदा मंदिर परिसरात लाडू विक्री केंद्रावर गर्दी होईल या कारणाने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे लाडू विक्रीत मोठी घट दिसून आली. विशेष म्हणजे यंदा लाडूच्या दरात वाढ केली होती. २०१९ च्या तुलनेत लाडू विक्रीच्या माध्यमातून जवळपास ४३ लाख रुपयाचा फटका समितीला बसला. असे असले तरी इतर ठिकाणाहून समितीला ५ कोटी ७० लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. जे की २०१९ च्या तुलनेत १ कोटीची वाढ झाली आहे.