येणाऱ्या काळात तुम्ही नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल. माझं बोलणं टेप करून ठेवा. एकही आश्वासन खोटं होणार नाही, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना देत घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला.
गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी गडकरींनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. नाशिककरांना प्रगतीचे नवे स्वप्न दाखवले. त्यांनी नाशिकचा उड्डाणपूल करणाऱ्या कंत्राटदाराचे कौतुक केले. सोबतचद्वारका ते नाशिकरोड या 1600 कोटी खर्चाच्या डबल डेकर उड्डाणपुलाला मंजुरी दिली. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देत 1 महिन्याच्या आत ही दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गाच्या सहा पदरीकरणासह सिमेंट रस्त्यासाठीच्या कामाला पाच हजार कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक-मुंबई अंतर फक्त दोन तासांत कापले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. वरळी-बांद्रा पुढे मला वसईपर्यंत जोडायचं होतं, ते मला त्यावेळी शक्य झालं नाही. मात्र, नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासांत गाठता आलं पाहिजे, हे काम करायचं असल्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. नाशिक शहराच्या बाजूला लॉजिस्टिकसाठी जागा असेल तर द्या, मी हा विभाग डेव्हलप करतो. महापालिकेने जागा दिल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने लॉजिस्टिक पार्क उभारू, असे गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गावर नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी उभारावी. नाशिकचा विकास करताना इकॉनॉमिक्स बरोबर इकॉलॉजी सांभाळावी. समुद्राला वाहून जाणारं पाणी अडवणे महत्वाचं आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातचं एकमत होत नसल्यानं तुला ना मला पाणी चाललं समुद्राला, अशी परिस्थिती झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातात लाखो लोकांचे हात-पाय जातात. इतर काही राज्यात अपघातांचं प्रमाण कमी आहे. मात्र, महाराष्ट्रात त्या तुलनेत अपघात कमी झाले नाहीत. त्यामुळे झिरो अपघात उपक्रमासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.