महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख स्पष्टपणे सांगितली जात नव्हती. पण आता याबाबतची निश्चित माहिती समोर आली आहे. येत्या 22 जुलैला म्हणजेच शुक्रवारी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या दिवशी 12 मंत्री आपल्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. यापैकी पहिला टप्पा हा 22 जुलैला पार पडेल. दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या तर हा विस्तार 23 जुलैला होणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 5/7 या आधारावर ही शपथविधी पार पडणार आहे. शिंदे गटाचे 5 मंत्री आणि भाजपचे 7 मंत्री असे एकूण 12 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दिल्ली हाय कमांडची मंत्रिमंडळ विस्तारावर बारीक नजर आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत याआधी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे. त्यामुळेच भाजपकडून याला होकार दिलेला नाही. एवढंच नाहीतर भाजपमध्येही चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये नकोत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद द्यावे, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तार रखडलेला आहे.
कोणत्या पक्षाला कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपाकडे तर नगरविकास आणि महसूल ही खाती शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.
किती मोठे मंत्रिमंडळ असेल ?
91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.