आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन सुरू होण्यास काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्समधील मतभेद उघड झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचं सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेकदा मजेशीर ट्विट्स केले जातात. त्यामध्ये काही वेळा एखाद्या व्यक्तीला ट्रोल देखील केले जाते. शुक्रवारी राजस्थानच्या ट्विटर अकाऊंटवरी एका ट्विटनं मोठा गोंधळ झाला.
राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरून शुक्रवारी कॅप्टन संजू सॅमसनचा एक फोटो शेअर करण्यात आला. फोटो शॉपच्या मदतीनं त्यामध्ये बदल करण्यात आले होते. सॅमसनला एका महिलेच्या रूपात त्या फोटोमध्ये दाखवण्यात आले होते. तसंच त्या फोटोला ‘क्या खूब लगती हो’, असं कॅप्शन देण्यात आलं. सॅमसनला हे ट्विट आवडले नाही. त्याने सोशल मीडियावर जाहीरपणे या ट्विटवर नाराजी व्यक्त केली.
‘मित्रांनी या प्रकारची थट्टा करणे ठीक आहे, पण टीमनं व्यावसायिक असलं पाहिजे’ असं ट्विट संजू सॅमसननं केलं. संजू सॅमसनच्या या ट्विटनंतर राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली. त्यांनी हे ट्विट तातडीनं डिलीट केले.
राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये त्यांनी ‘आजच्या घटनेचा विचार करून आम्ही सोशल मीडिया टीम आणि त्यांची पद्धत बदलणार आहोत हे जाहीर केले.
‘पहिल्या मॅचपूर्वी आमच्या टीममध्ये सर्व काही ठीक आहे. सर्व खेळाडू SRH विरूद्धच्या मॅचची तयारी करत आहेत. मॅनेजमेंट डिजिटल रणनीतीव पुन्हा एकदा विचार करेल आणि येत्या काळात नव्या टीमची नियुक्ती करण्यात येईल. आयपीएल सिझनमध्ये आमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नियमित माहिती मिळावी, अशी फॅन्सची इच्छा असते, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही त्याची खबरदारी घेऊ.’ असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
संजू सॅमसन 2013 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यानं आयपीएल कारकिर्दीत आजवर 121 मॅच खेळल्या असून त्यामध्ये एकूण 3068 रन केले आहेत. त्यामध्ये 3 सेंच्युरी आणि 15 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.तसंच त्याचा स्ट्राईक रेट 134 पेक्षा जास्त आहे. संजूला राजस्थाननं ऑक्शनपूर्वीच 14 कोटींमध्ये रिटेन केले होते.