आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल.
या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.
हॉलमार्किंग केंद्रांची संख्या वाढवल्याचा सरकारचा दावा
गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य आहे. भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. यापैकी केवळ 35,879 आस्थापने BIS सर्टिफाइड आहेत.
सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.