देशातील 10 राज्यात चिंतेचे वातावरण, महाराष्ट्राचाही समावेश

देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत पहिल्या 10 राज्यांमध्ये आहेत. या राज्यांच्या सतत संपर्कात असून या राज्यांना आवश्यक मार्गदर्शनही केलं जात असल्याचं राजेश भूषण यांनी सांगितलं.

राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काहीशी चिंता आहे. आम्ही या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत आणि सतत परिस्थितीचा आढावा घेत आहोत. असं असलं तरी कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्णांच्या तुलनेत मृत्यूची संख्या खूपच कमी झाली आहे. दुसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 2 टक्के होती, आता तिसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 72 टक्के इतकी आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, सध्या जगात कोविडची चौथी लाट (corona fourth wave) दिसून येत आहे. गेल्या 1 आठवड्यात दररोज 29 लाख केसेसची नोंद झाली. गेल्या 4 आठवड्यांत आफ्रिकेत कोविडची प्रकरणे कमी होत आहेत. युरोपमध्येही केसेस कमी होत आहेत. पण आशियामध्ये कोविडची प्रकरणे वाढली आहेत.

भारतात सध्या सुमारे 19 लाख सक्रिय रुग्ण आहेत, गेल्या एका आठवड्यापासून सुमारे 2,71,000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. सकारात्मकता दर 16 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 3,17,000 रुग्णांची नोंद झाली आहे. राजेश भूषण पुढे म्हणाले की, केरळमध्ये सकारात्मकतेचे प्रमाण ३२ टक्के आहे. दिल्लीत सकारात्मकता दर 30 टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये तो 6 टक्क्यांहून थोडा जास्त आहे. देशात 11 राज्ये आहेत जिथे 50 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत, तर 13 राज्यांमध्ये 10-50 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.