राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. उद्या कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता.
परभणीला जोरदार पावसानं झोडपलं आहे. सोनपेठ तालुक्यातील थळीउक्कलगाव,शेळगावं परिसरात दमदार पाऊस झाला. परिसरातील फालगुनी नदीला अचानक पूर आल्याने परिसरातील नागरिकांना गुडग्या एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली.
गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपुरात हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. गीता मंदिर शेजारच्या रस्तावर तर पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे.
गडचिरोलीत संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्वाधिक पाऊस देसाईगंज तालुक्यात झाला आहे. तर गडचिरोली शहरातील सखल भागात पाणी साठले आहे. नगर पालिका इमारतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आल आहे. पाणी साठण्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नाल्यांवरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय.. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पावसाच्या पुनरागमनानं रायगड जिल्ह्यातील शेतीची खोळंबलेली कामं पुन्हा सुरु झालीत. शेतात चांगले पाणी झाल्याने भात लावणीच्या कामाला वेग आलाय. लावणीच्या वेळी गायल्या जाणाऱ्या आंबोण्यांचे सूर ऐकू येऊ लागल्याने शेतशिवारांना जाग आलीय.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील अन्य काही भागातही पावसाची धुवांधार बॅटींग केली नाशिक शहरातल्या काही सखल भागात पाणी साचलं आहे. तसच मुसळधार पावसानं शहरातल्या अनेक भागातले रस्तेही जलमय झाले.
पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर सणसवाडी पारगाव परिसराला जोरदार पावसाने झोडपले.. गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस परतल्यानं बळीराजा सुखावला आहे.
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला, त्यामुळं तब्बल 65 टक्के शेतक-यांनी पेरणी केली, मात्र या सगळ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जर दोन चार दिवसात पावसानं चांगली हजेरी लावली नाही तर शेतक-याचं मोठं नुकसान होणार आहे.