‘चोरीच्या मालावर दुकान फार काळ चालत नाही’ शिवसेनेचा शिंदेंना सणसणीत टोला

 ‘‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून कोठडीत मुक्कामी आहे. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर अग्रलेखातून हल्लाबोल सुरूच आहे.

‘मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत. संभाजीनगरच्या मुक्कामी मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.

‘शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाडय़ा ‘ईडी’ने आवळल्यावरच त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे संभाजीनगरात म्हणाले, ‘राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे.’ शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? असा सवालही सेनेनं केला.

‘राज्यात शिंदे-फडणवीसांनी फक्त शपथ घेतली. त्याला एक महिना उलटूनही अद्याप सरकारचा पाळणा हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशीच या लोकांची अवस्था झाली आहे. शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल, अशी टीकाही सेनेनं केली.

‘सिल्लोडची भूमी त्यांनी क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी निवडली, पण सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान तर्कसंगत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाले असते तर राष्ट्रवादीचे गुणगाण करताना हे महाशय दिसले असते. शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रिपद हडपायचे होते. भाजप-ईडी युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला. तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे. पुन्हा ‘गेल्या अडीच वर्षांत बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा झाली. त्यांच्या विरोधी भूमिका घेण्यात आली,’ असा ‘दिव्य दाहक’ विचारही शिंदे यांनी मांडला. बाळासाहेबांच्या कोणत्या विचारांशी प्रतारणा झाली आणि आता शिंदे व त्यांचा गट बाळासाहेबांचे कोणते विचार पुढे नेत आहेत? असा टोलाही सेनेनं लगावला.

मराठी अस्मितेवर व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अपमानाच्या गुळण्या टाकण्याचे काम राज्यपाल महोदयांनी केले, पण शिंदे यांनी त्यावर गप्प बसणे पसंत केले. महाराष्ट्राचा अपमान सहन करा व शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कुणी नख लावत असेल तर चवताळून उठा, अपमान करणाऱ्याच्या नरडीचा घोट घ्या, हाच बाळासाहेबांचा विचार आहे व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना शिंदे यांनी त्या विचारांशी प्रतारणा केली. हे खरे की खोटे? मग महाराष्ट्राच्या बदनामीचा, मराठी माणसाला खतम करण्याचा, महाराष्ट्रातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा राज्यपाली डाव शिंदे का बरे हाणून पाडू शकले नाहीत? मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असा टोला त्यांनी मारला. मग त्यांना कोणी अडवले आहे? असा थेट सवाल शिवसेनेनं शिंदेंना विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.