भयपटांसाठी प्रसिद्ध ‘रामसे बंधू’मधील कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बहुतेक ‘रामसे ब्रदर्स’ निर्मित भयकथा असणाऱ्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुमार रामसे 85 वर्षांचे होते. कुमार यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी पीटीआयला या संदर्भात माहिती देताना सांगितले की, कुमार रामसे यांनी मुंबईतील हिरानंदानी येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. कुमार यांच्या पश्चात पत्नी शीला आणि तीन मुले राज, गोपाळ आणि सुनील असा परिवार आहे

याबद्दल माहिती देताना गोपाळ रामसे म्हणाले की, सकाळी साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते आम्हा सर्वांना सोडून निघून गेले आहेत. रात्री 12च्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. आम्ही सध्या पुजारी येण्याची वाट पाहत आहोत.’

सात भावांमध्ये सर्वात मोठे
कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. 70 आणि 80च्या दशकात ते कमी बजेटचे कल्ट चित्रपट बनवायचे.

‘पुराना मंदिर’ (1984), ‘साया’ आणि ‘खोज’ (1989) यासह रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्यात कुमार यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ‘साया’ मध्ये मुख्य भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांनी साकारली होती आणि 1989 ची हिट फिल्म ‘खोज’ मध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. 1979च्या ‘और कौन’ आणि 1981मध्ये ‘दहशत’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.