तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा विध्वंस घडविलेल्या ६ फेब्रुवारीच्या भूकंपानंतर सुरू झालेले मदत आणि बचावकार्य अद्याप सुरू असले तरी आता इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली जिवंत आढळणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत अनेकांना ढिगाऱ्यांखालून सुखरूप बाहेर काढले आहे. तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपबळींची एकूण संख्या आता ४१ हजार ७३२ झाली आहे. ती आणखी वाढण्याची भीती आहे.तुर्कस्तानमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथे भूकंपाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३८ हजार ४४ इतकी झाली आहे. या भूकंप रिश्टर स्केलवर ७.८ इतक्या तीव्रतेचा नोंदला गेला. अलीकडील काळातील हा सर्वात भीषण भूकंप ठरला आहे.
भूकंपाला दहा दिवसांहून अधिक काळ उलटला असून बचाव कार्य अव्याहतपणे सुरू आहे. शुक्रवारी बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून एक बालक, महिला आणि दोन पुरुषांची सुटका केली. कहरामनमारस येथे ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. तेथून २१ वर्षीय महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत बाहेर काढण्यात आले. सुमारे २५८ तासांनी त्यांची सुटका झाली, असे वृत्त डीएचए या वृत्तसंस्थेने दिले आहे.
त्याशिवाय अंताक्या शहरातून पोलिसांनी १२ वर्षांच्या उस्मानला जिवंत बाहेर काढले. त्या आधी तेथून १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले.पोलीस पथकाचे प्रमुख ओकान तोसून म्हणाले की, या ठिकाणी कोणी जिवंत मिळण्याची आशा आम्ही सोडली होती, पण २६० तासांनंतर आम्हाला उस्मान जिवंत सापडला. याच ठिकाणी कोसळलेल्या एका रुग्णालयाच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या दोन व्यक्तींपर्यंतही बचाव पथक पोहोचू शकले. त्यापैकी एक असलेल्या मुस्तफा अवसी याने बचाव कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनवरून आपल्या भावाशी संपर्क साधला. आपले सर्व कुटुंबीय जिवंत आहेत का, अशी विचारणा त्याने केली. मला त्यांच्याशी बोलायचे आहे, असे तो म्हणाला.
सीरियन निर्वासितांना स्पेनचा दिलासा
माद्दिद : स्पेनचे स्थलांतरविषयक मंत्री जोस लुईस एस्क्रिव्हा यांनी जाहीर केले की, तुर्कस्तानमधील भूकंपामुळे पीडित झालेल्या सीरियन निर्वासितांपैकी सुमारे शंभर जणांना स्पेनमध्ये आश्रय दिला जाईल. भूकंपामुळे गंभीर आपत्तीत असलेल्या लोकांची मदतीसाठी निवड केली जाईल.