राज्यातील कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने अधिक काळ सुरु ठेवता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
तसेच विरेन शाह यांनी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे काही मागण्या केल्या आहेत. राज्यात ज्याठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि 25 टक्के बेडस् रिक्त आहेत, अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरेन शाह यांनी केली आहे. आता ठाकरे सरकार या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध काही अंशी शिथील होणार आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने (Shops) आता सकाळी 7 ते दुपारी दोनपर्यंत उघडी ठेवली जातील. तसेच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला पुणे महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 60 टक्के ऑक्सिजन बेडस् रिकामे आहेत. अशा ठिकाणी प्रशासनाकडून निर्बंधांमध्ये काही सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा पुणे शहराला मिळणार आहे.