पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीत तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. राजगड येथील केळवडे येथील एका गावात काही तरुण-तरुणांनी डान्स पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या डान्स पार्टीत पैशांची उधळण देखील करण्यात येत होती. तसेच मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली.
पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळताच त्यांनी केळवडे गावातील बंगल्यावर छापा टाकला. यावेळी त्यांना बंगल्यात अनेक गोष्टी दिसल्या. विशेष म्हणजे इथे पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता. बंगल्यात रंगीबेरंगी लाईट लावण्यात आले होते. साउंड सिस्टिमचा मोठा आवाज येत होता. तसेच काही तरुणांकडून पैशांची उधळण केली जात असल्याचं पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी तातडीने हा सर्व नंगानाच थांबवला. त्यांनी 13 तरुण-तरुणीला अटक केली. त्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याशिवाय यापुढील तपासही पोलिसांकडून सुरु आहे.
विशेष म्हणजे पुण्यातील ही पहिला घटना नाही. गेल्या 30 दिवसांपूर्वी म्हणजेच 1 मे रोजी देखील अशीच एक घटना समोर आली होती. त्यावेळी बंगळ्यात सर्रासपणे देहविक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. पुण्यात एका फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनची खिल्ली उडवण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊन असताना तिथे पार्टी आयोजित करण्यात आली. त्यानंतर पार्टीच्या नावाखाली तिथे सर्रासपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. शेजारच्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
समीर ऊर्फ नितेश पायगुडे या इसमाने लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पुण्याजवळ लबडे फार्महाऊसवर सहा तरुणींना फोन करुन बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर काही लोकांना इथे मजा-मस्ती करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.