आज दि.१७ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तानने
दहशतवादी पाठवले : अशरफ गनी

अफगाणिस्तानात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तालिबानला शांततेच्या चर्चेत सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यास अपयशी ठरल्याबद्दल अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पाकिस्तानावर टीका केली आहे. ताश्कंद येथे सुरू असलेल्या एका संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांच्या आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी १० हजारांहून अधिक जेहादी दहशतवादी अफगाणिस्तानात पाठविल्याचा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची
पंतप्रधान कार्यालयात भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची एक तास पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची भेट झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी देशातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसात शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, पियुष गोयल यांची भेट घेतली. पवार यांची पंतप्रधांनाबरोबर भेट झाली आहे.

पंढरपूरला विठोबाच्या महापूजेचा
मान वर्ध्याच्या दाम्पत्याला

आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दर्शन रांगेतून एकाची निवड करुन मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. मंदिरातच सेवा देणाऱ्या एका सेवेकऱ्याची निवड करुन महापूजेचा मान दिला जात आहे. यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील दांम्पत्याला हा मान मिळाला आहे. केशव शिवदास कोलते(७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) रा. संत तुकाराम मठ, वर्धा असे महापूजेचा मान मिळालेल्या दांम्पत्याचे नाव आहे.

नाशिकमध्ये मनसे भाजप
एकत्र येण्याची शक्यता

राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच म अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असून दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहावरच आहेत. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकाला भेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात
दरम्यान आठ हवाई मार्गांना मंजुरी

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठीच्या नवीन आठ हवाई मार्गांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जबलपूरचे खासदार राकेश सिंग, नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंग खरोला आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण
करण्यास परवानगी

चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करोनाविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित करोना तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सूचना दिल्या.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’
व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ

आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी २००३ साली अमेरिकेत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने ही माहिती दिली आहे. मंकीपॉक्सबाधित व्यक्तीला डल्लासमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रुग्णांने नायजेरियातून अमेरिकेत प्रवास केला होता. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मंकिपॉक्सचा संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वैद्यकीय यंत्रणा तपासणी करत आहेत.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी;
19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

तिसर्‍या लाटेचा धोका वाढू लागला,
आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्‍या लाटेचा धोका वाढू लागला. येत्या काही दिवसांबाबत आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेकडे वाटचाल करत आहे. पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे आहेत, या वेळी लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांत तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आतापासून खबरदारी घेतली पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

2023 अखेर पर्यंत राम मंदिराचे
दरवाजे उघडण्याचा निर्णय

देशभरातील रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 2023 अखेर पर्यंत राम भक्तांसाठी राम मंदिर दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांची नुकतीच अयोध्येत बैठक झाली. ही बैठक ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

लस घेतलेले लोक डेल्टा
व्हेरिएंटने संक्रमित

गेल्या वर्षभरापासून अनेक देश कोरोनाशी लढा देताय. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. तर कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यास इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने केला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.