कोल्हापूर जिल्ह्यात काल 430 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत कही खुशी कही गम अशी परिस्थिती पहायला मिळाली तर काही ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या एक मताने सदस्य निवडून आल्याने जल्लोष करत असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान जिल्ह्यात 430 ग्रामपंचायतींमध्ये करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अत्यंत चुरशीच्या लढती पहायला मिळाल्या. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गावात मनसेने जिल्ह्यात एकमेव जागा निवडून आणली आहे. माजी सरपंचांना विरोधात ही जागा लढवली जात होती यामध्ये माजी सरपंचांचा दारूण पराभव झाला.
हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचा निकाल काल(दि. 20) सकाळी 8 वाजल्यापासून लागण्यास सुरूवात झाली. यामध्ये सकाळी 9 दरम्यान हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गावचा निकाल हाती आला. यामध्ये वॉर्ड क्रमांक 6 मधून मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र आप्पासो आडके हे माजी सरपंच महेश नाझरे यांच्या विरोधात राहिले होते.
यामध्ये नाझरे यांचा तब्बल 182 मतांनी पराभव करत कोल्हापूर जिल्ह्यात मनसेने खाते खोलले. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यानेच राज ठाकरेंना पहिला सरपंच निवडून दिला होेता. कोल्हापूर जिल्ह्यात मनसेने खाते खोलल्याने शिवसेना, शिंदे गटासोबत आता मनसेही आपले ग्रामाीण भागात लोन पसरवत असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान पट्टण कोडोलीमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने लोकनियुक्त सरपंचपद आणि 11 जागा जिंकत उपसरपंच पदासाठीची ही तयारी करण्यास सुरूवात केली आहे.
भाजी विक्रेता झाला सरपंच
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे. आनंदा रामचंद्र भोसले असं सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराचं नाव आहे.
आनंदा हे शिवसेना ठाकरे गटाकडून सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी उभारले होते. त्यांच्या विरोधात जन सुराज्य शक्तीचे विश्वास भोसले रिंगणात होते. या निवडणुकीत आनंदा यांना 391 तर विश्वास यांना 330 मतं मिळाली. आनंदा यांनी कोरे गटाच्या उमेदवाराचा 60 मतांनी पराभव केला.
आनंदा हे पहिल्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श समोर ठेवणारे कट्टर शिवसैनिक आहेत. विजय मिळाल्याचं समजताच त्यांनी बाळासाहेबांचा फोटो उंचावून विजयाचा जल्लोष साजरा केला. आंनदा हे सरपंच झाल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे वरेवाडीसह बांबवडे पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.