कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेवरील ताण बहुतांश प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ओपीडी सेवा सुरु केली. भविष्यात या ठिकाणी संसर्गजन्य आजारांवरील रुग्णसेवा दिली जाईल, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी करण्यात येत आहे. शहरात महापालिकेची पाच रुग्णालये आणि 34 आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर सुविधांचा अभाव आहे. आता मात्र महापालिकेकडून आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहे.
दिल्लीत ज्या पद्धतीने दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाते, त्या पद्धतीनेच औरंगाबादमध्ये सेवा मिळावी, म्हणून प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 30 कोटी रुपयांचा निधी वापरून शहरात तीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालये सुरु करण्यात येतील. तसेच शहरातील आरोग्य केंद्र अद्ययावत करण्याचे कामही लवकरच सुरु होईल, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या तीनपैकी सर्वात मोठे 60 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेडकर नगर येथे उभे राहील, अशी योजना आखण्यात आली आहे. तसेच इतर दोन रुग्णालयांचीही तरतूद कऱण्यात आली असून त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. ही माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
शहरात महापालिकेची पाच रुग्णालये आणि 34 आरोग्य केंद्र आहेत. मात्र किरकोळ जखमी झालेला रुग्ण आरोग्य केंद्रात गेला तरीही त्याला दोन टाके देण्यासाठीचा आधुनिक धागा महापालिकेकडे नाही. कुत्रा चावल्यावर देण्यात येणारे इंजेक्शन घेण्यासाठीदेखील घाटी रुग्णालयात जावे लागते. राज्य आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबवण्याचे एकमेव काम सध्या आरोग्य विभागाकडून सुरु आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी चाचपणी
दरम्यान, राज्यातील काही मोठ्या महापालिकांनी यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालय सुरु केले आहेत. औरंगाबाद महापालिकेचेदेखील अशाच प्रकारे एक स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असायला हवे, त्या दृष्टीनेही प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय महालिद्यालयांसाठी किमान 800 खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. मनपाकडे सध्या 350 बेडचे स्वतंत्र मेल्ट्रॉन हॉस्पिटल आहे.