महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिवाळीमध्ये खिश्याला चांगलीच कात्री लागणार आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या काळात तिकीटांचे दर 10 टक्क्यांनी महागणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. सुट्टी टाकून चाकरमानी गावाकडे जाण्याची तयारी करत आहे. मात्र, लालपरी अर्थात एसटी बसच्या तिकीटांमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे महसूल तोट्यात असल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार आहे.
दिवाळीच्या काळात एसटी बसेसला जास्त गर्दी असते. या गर्दीच्या हंगामामध्ये महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. त्यामुळे 21 तारखेच्या मध्यरात्रीपासून नवी भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील.
नवीन भाडेवाढ ही परिवर्तन, निमआरामी हिरकणी, शिवशाही आणि स्लिपर कोच बसेससाठी लागू असणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाढ लागू नसणार नाही. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीटांचे आरक्षण केले असेल तर वाहकाकडून नव्या दरानुसार, तिकीट आकारले जाणार आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय हा पासधारकांना लागू नसणार आहे. मासिक/त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना ही भाडेवाढ लागू नाही. 31 तारखेनंतर गर्दीचा हंगाम संपल्यानंतर भाडेवाढ शिथील करण्यात येणार आहे.