आज दि.१४ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सलून चालकाच्या पोरीची कमाल, MPSC परीक्षा पास करत बनली RTO इन्स्पेक्टर

राज्यात लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र, फार मोजकेच विद्यार्थी या कठिण परिक्षेतून पास होतात. दरम्यान, नुकताच राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एका सलून चालकाच्या मुलीने गगनभरारी घेत एमपीएससीची परिक्षा सर केली आहे आणि आरटीओ इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे.सृष्टी दिवाकर नागपुरे, असे या यशस्वी कन्येचे नाव आहे. ती काटोल येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. तसेच घरची परिस्थिती बेताची आहे. या परिस्थितीतून हार न मानता सृष्टी दिवाकर नागपूरे या तरुणीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे.

फुटबॉल वर्ल्ड कप इम्पॅक्ट, कतार एअरवेज करणार जम्बो भरती

यंदा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 कतारची राजधानी दोहा येथे होणार आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रवाशांच्या आणि क्रीडाप्रेमींच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कतार एअरवेज कोरोनानंतरचा सर्वांत मोठा व व्यापक विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कतार एअरवेज आपल्या कर्मचार्‍यांची संख्या 10,000 ने वाढवणार आहे, असं एअरलाइनने रॉयटर्सला सांगितलंय. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअरलाईन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 45,000 वरून 55,000 वर जाईल, अशी माहिती कंपनीच्या एका प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

आमच्याकडे पैसे ठेवा, मिळणार सर्वाधिक व्याज; नामांकीत बँकेचा ग्राहकांना SMS

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर सगळ्या बँकांनी EMI आणि व्याजदरात वाढ केली. ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे FD आणि RD वरील व्याजदरात वेगानं घट होत आहे. त्यामुळे ग्राहक शेअर मार्केट, बाँडकडे वळत आहेत. दुसरी बँक बुडण्याची भीती असल्याने बँकेत जास्त पैसे ठेवत नाही. मात्र आता बँका सुरक्षेची हमी देऊन ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत.

एका नामांकीत बँकेनं ग्राहकांना आता RD साठी ऑफर दिली आहे. तसा SMS देखील केला आहे. एचडीएफसी बँकेने RDवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर 11 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले. एचडीएफसी बँकेने ठरावीक मुदतीच्या व्याजदरात ५० बेसिस पॉइंटपर्यंत वाढ केली.

नशीब म्हणतात ते हेच का? कर्जाच्या थकबाकीची नोटीस आली अन् लागली लॉटरी

एका व्यक्तीला 70 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. तेही अशा वेळी जेव्हा त्याला पैशांची खूप गरज होती, आणि तेव्हाच नशिबानं त्याला साथ दिली. लॉटरी लागलेल्या या व्यक्तीच नाव पुकुंजू असं असून, तो केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यातील मैनागपल्ली येथील आहेत. पुकुंजू हे 12 ऑक्टोबर 2022 ही तारीख कधीही विसरणार नाहीत. कारण याच दिवशी त्यांना लॉटरी लागली.

40 वर्षीय पुकुंजू हे मासेविक्रेते असून ते कर्जबाजारी होते. पण त्यांच्या नशिबानं असा खेळ खेळला, की काही तासांतच ते मालामाल झाले. विशेष म्हणजे बँकेने त्याचदिवशी पुकुंजू यांना कर्जाचे हप्ते थकल्यामुळे नोटीस बजावली होती.

‘…नाहीतर मी राजकारणात आलो नसतो’, अमित ठाकरे यांचं मोठ विधान

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत घरोबा केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे राज्यातले राजकारण गढुळ झाले आहे. ‘मी आधीच राजकारणात आलो ते बर झालं. आजची परिस्थिती पाहता मी आताच्या काळात राजकारणात आलो नसतो’ असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजिव अमित ठाकरे केलं आहे.राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अमित ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळावा आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

दिवाळीपूर्वी तेल विक्रेत्यांना चाप, अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर!

प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.दिवाळीमध्ये फराळ साहित्य बनवले जाते. यासाठी खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. दिवाळीत तेलाची मागणी वाढते. मात्र, वाढल्या मागणीमुळे तेलात भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. सरकारनेही सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानुसार वर्धा जिल्हा अन्न व औषधी प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सात तेल विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. 

होलसेल व्यापाऱ्यांना सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार होलसेल विक्रेत्यांना पॅकिंग न फोडता तेलाची विक्री करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या या आदेशामुळे व्यापारी व होलसेल विक्रेत्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी वारंवार मुदतवाढ दिलेली आहे. मात्र, अन्न व औषधी प्रशासनाकडून जिल्ह्यात भेसळीबाबत तपास मोहीम राबविली जात आहे.

मुंबईत कार सुरू करण्याआधीच करावं लागणार हे काम! ट्रॅफिक पोलिसांचे आदेश

मुंबईमध्ये तुमची कार सुरू करण्याआधीच तुम्हाला सावध व्हावं लागणार आहे, कारण ट्रॅफिक पोलिसांनी नवा आदेश काढला आहे. मुंबईत गाडी चालवत असताना आता ड्रायव्हरसोबतच त्याच्या सहप्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हा नवा आदेश जारी केला आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मुंबई ट्रॅफिक पोलीस कडक कारवाई करणार आहेत.

ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या कारमध्ये सिटबेल्ट नाही किंवा ज्या कारमधला सिटबेल्ट खराब आहे, त्यांनी कारमध्ये सिटबेल्ट 31 ऑक्टोबरपर्यंत लावून घ्यावेत. 1 नोव्हेंबरपासून कारमध्ये सीटबेल्ट लावणं कम्पलसरी करण्यात आलं आहे.

सप्तश्रृंगीच्या घाटात धावणार धावपटू, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गडावर येत्या रविवारी 16 ऑक्टोंबर 2022 रोजी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट आणि नाशिक रनर्स यांच्या वतीने सप्तशृंगी हील मॅरेथॉन सहावे पर्व आयोजित करण्यात आले आहे.

सप्तशृंगी गड म्हणजे निसर्गाचा अभूतपूर्व देखावा आहे.अगदी प्रसन्नमय वातावरण या ठिकाणी आहे.तसेच आपल्या सदृढ शरीरासाठी व्यायामाची,धावण्याची गरज असल्याची सर्वांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी,आणि या परिसरातील अल्हाददायक वातावरणाचा राज्यातील सर्व धावपट्टूना आनंद घेता यावा या उद्देशाने या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ प्रशांत देवरे यांनी दिली आहे.

‘400 ते 500 जणांनी फोन केले आणि…’, व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजनांचं अखेर स्पष्टीकरण

शिक्षक भरती प्रकरणावरून एका विद्यार्थ्यासोबत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अखेरीस, या वादावर महाजन यांनी खुलासा केला आहे, कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. पण हा विषय माझ्या खात्यातला नाही. यावर शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गृहमंत्र्यांसाठी तैनात पोलिसांच्या गाडीखाली जिवंत जळला बाईकस्वार; पोलीसच बनवत राहिले VIDEO

आपला जीव धोक्यात घालून किंवा आपल्या जीवाची बाजी लावून सामान्य नागरिकांचा जीव वाचवणारे पोलीस. अशा कर्तव्यनिष्ठ पोलिसांचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहूनच अशा पोलिसांचा अभिमान वाटतो. पण सध्या पोलिसांचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून संताप व्यक्त केला जातो आहे. गृहमंत्र्यांच्या सभेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या गाडीखालीच एक बाईकस्वार जिवंत जळाला आणि त्याला वाचवण्याऐवजी पोलीसच त्याचा व्हिडीओ बनवत राहिले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बिहारच्या देवरिया गावाजवळील ही संतापजनक घटना. छपरा-सिवान हायवेवर पोलिसांच्या बसने एका बाईकला धडक दिली. दोन तरुण उडून रस्त्यावर पडले. तर एक तरुण बाईक आणि बससह फरफटत गेला. काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांच्या बसच्या फ्युएलचा टँक फुटला आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर बसच्या खाली आग लागली. या आगीत गाडीला अडकलेला बाईकस्वार जळाला.

हिजाब प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची मते भिन्न

मागच्या काही महिन्यांपासून कर्नाटकात हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान काही महाविद्यालयात हा वाद इतका टोकाचा झाला होता की यामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये लक्ष घालून प्रकरण मिटवले होते परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यावर आज सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (दि.13) गुरुवारी कर्नाटकच्या हिजाब वादावर आपला निर्णय देण्यात आला. दोन्ही न्यायाधीशांची या विषयावर वेगवेगळी मते असल्याने यावर मोठे खंडपीठ बसवण्यात येणार आहे. आता या प्रकरणावर मोठ्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार आहे.

ज्ञानवापी मस्जिद प्रकरण; शिवलिंगाच्या Carbon Dating बद्दल न्यायालयाचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी-माता शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी वाराणसी येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात झाली. ज्ञानवापी मशिदीच्या वजूखानामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) वैज्ञानिक तपासणी करण्याच्या मागणीवर न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने शिवलिंगाचं कार्बन डेटिंग करण्यास नकार दिला आहे.

शिवलिंगासारख्या सापडलेल्या संरचनेचे वय, लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात यावे ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

चिंता वाढली! Omicron च्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रसार, कितपत घातक आाहे हा विषाणू?

कोरोना महामारीची तीव्रता एकदम कमी झाली असली तर अधूनमधून काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. आता काही राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नवीन सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. एक्सबीबी (XBB) असं नाव असलेल्या या सब-व्हेरियंटची लागण झालेल्या 71 रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. गुरुवारी (13 ऑक्टोबर) महाराष्ट्रामध्ये एक्सबीबीच्या पाच रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांमध्येही एक्सबीबीचे रुग्ण सापडले आहेत. अहवालानुसार, ओडिशामध्ये एका पंधरवड्यात 33, बंगालमध्ये 17 आणि तमिळनाडूमध्ये 16 एक्सबीबीचे रुग्ण सापडले आहेत.

ओमिक्रॉन एक्सबीबी सब-व्हेरियंटला BA.2.10 असंही म्हणतात. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, डेन्मार्क, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक देशांमध्ये विषाणूचा हा प्रकार आढळला आहे. सिंगापूरमध्येही एक्सबीबी रुग्णसंख्येची वाढ होत आहे. मात्र, अद्याप त्याचे गंभीर परिणाम निदर्शनास आलेले नाहीत, असं तेथील आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. दरम्यान, डब्ल्युएचओने ओमिक्रॉनला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे त्याच्या सबव्हेरियंट्सलाही त्याच गटात टाकण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या पुतण्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तसेच, शिवसेनेतून कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश सुरु झाल्याने पक्षाची वाताहात झाली आहे. त्यात आता आणखी एका शिवसेना नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे.

माजी आमदार अवधुत तटकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज ( 14 ऑक्टोंबर ) मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश झाला. अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. माजी आमदार अनिल तटकरे यांचे जेष्ठ चिंरजीव आहेत.

हिमाचल प्रदेशात निवडणुकीचं बिगूल, निवडणूक कार्यक्रम जाहीर, गुजरात मात्र अद्याप प्रतिक्षेत

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी ८ डिसेंबर रोजी पार पडेल, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

बसमध्ये भीषण स्फोट, मालीत ११ जणांचा मृत्यू, ५३ जण गंभीर जखमी

मध्य मालीमध्ये एका बसमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बस स्फोटकांनी भरलेल्या उपकरणाला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एएफपी’ने या घटनेचे वृत्त दिले आहे.

T20 World Cup मराठी प्रक्षेपणाबाबत मोठा अपडेट; स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला

रविवारी म्हणजेच १६ ऑक्टोबर पासून सुरु होणारा टी २० विश्वचषक हा मराठीतही प्रक्षेपित का करत नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारले होते. स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आणि मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आज, शुक्रवारी १४ ऑक्टोबरला आंदोलन करणार होती मात्र तत्पूर्वीच आता स्टार स्पोर्ट्सच्या अधिकाऱ्यांनी समजुतीचा सूर धरला आहे. विश्वचषक मराठी प्रक्षेपणाच्या संदर्भात उद्या स्टार स्पोर्ट्सचे प्रशासकीय अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने दाखवली ताकद, न्यूझीलंडला त्यांच्याच घरात हरवून जिंकली तिरंगी मालिका

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला टी२० विश्वचषकापूर्वी बूस्टर डोस मिळाला आहे. त्याने यजमान न्यूझीलंडचा ५ गडी राखून टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पराभव केला. मात्र, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद नवाजने पुन्हा एकदा सुरेख खेळी करत ३८ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.३ षटकात ५ गडी राखून लक्ष्य गाठले. टी२० विश्वचषक २०२२चे सामने १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.

गुजरातमध्येही बुलेट ट्रेनला विरोध, नागरिक उतरले रस्त्यावर

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू आहे. मात्र, अहमदाबादमधील एका सोसायटीतील रहिवाशांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी गेल्या एक वर्षापासून निवेदने दिली. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे अहमदाबाद येथील या सोसायटीतील रहिवाशांनी अहमदाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करत बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत विरोध दर्शवला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.