बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने भारतातीलच नव्हे तर, जगभरातील कोट्यावधी लोकांची मने जिंकत आहेत. त्यांचे प्रत्येक संवाद त्यांच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ आहेत. अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक पात्राला आपले सर्वोत्कृष्ट दिले. आज (31 मे) बिग बींनी बॉलिवूडमध्ये आपली 52 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहेत. याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक गाजलेल्या पात्राचा फोटो कोलाज केला आहे. यात अमिताभ बच्चन यांच्या सात हिंदुस्थानी पासून यावर्षी रिलीज होत असलेल्या ‘मे डे’पर्यंत प्रत्येक लूक या पोस्टमध्ये दाखवला गेला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘52 वर्षे…. तसेच, ज्याने हे पोस्टर बनवले त्या व्यक्तीचे आभार.’ बिग बींची ही पोस्ट कोट्यवधी लोकांना आवडली आहे. तसेच, त्यांचे चाहतेही या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा देखील देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सर, मी तुमचा मोठा चाहता आहे.’ तर दुसर्या एका वापरकर्त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
बिग बींनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यांच्या ‘आनंद’ या चित्रपटासाठी त्यांना बरेच पुरस्कार देखील देण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘जंजीर’ या चित्रपटामुळे बिग बींनि इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या हक्काची एक खास जागा बनवली होती, जी आजपर्यंत अबाधित आहे.
अमिताभ बच्चन लवकरच अभिनेता इम्रान हाश्मीसमवेत आगामी ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर रिलीज झाला असून, या मिस्ट्री-थ्रिलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, ते हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर केवळ थिएटरमध्ये प्रदर्शित करतील. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसमवेत रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा यांच्यासह अनेक कलाकार ‘या’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.
अमिताभ बच्चन कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करत आहेत. नुकतेच त्यांनी पोलंडमधून 50 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स मुंबईसाठी मागवले आहेत. या कठीण काळात सर्वांना मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.