गुणरत्न सदावर्ते यांना अखेर अटक, चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला, याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे, याआधी सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्यावेळी मला नोटीस न देता ताब्यात घेण्यात आले आहे, हा माझ्या हत्येचा कट आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.

दुपारी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी अचानक मुंबईतील शरद पवार यांचं घर सिल्व्हरओकवर घोषणाबाजी केली. गेटतोडून आत येत आंदोलकांनी चप्पल आणि दगड भिरकावले. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाचं दार ठोकलं. घोषणाबाजी केली, यात काही आंदोलकांनी जय श्रीरामची घोषणा बाजी केली हे विशेष. आंदोलकांमध्ये महिला या पहिल्या फळीत होत्या. महिलांचा देखील आंदोलनात मोठ्या प्रमाणात समावेश दिसून आला.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक हे सिल्व्हर ओकच्या दिशेने येतील आणि असा हल्ला करतील हे मुंबई पोलिसांना समजू शकले नाही, याचा अंदाज त्यांना आला नाही, यावरुन हे मुंबई पोलिसांच्या गोपनीय शाखेचं अपयश असल्याचं म्हटलं जात आहे.

सुप्रिया सुळेंनी कोपरापासून हात जोडले
पवारांचं घर सिल्व्हर ओकवर हा संपकऱ्यांचा राडा सुरुच असताना, अचानक खासदार सुप्रिया सुळे या तिथे दाखल झाल्या, त्यांनी आंदोलकांना कोपरापासून हात जोडत शांत बसण्याची विनंती केली, तुम्ही शांतता पाळा, तुमच्या अडचणी समजून घेण्यास मी तयार आहे.

पण शांतता ठेवा आपण बसून बोलू अशी माझी नम्र विनंती आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. माझ्या घरात माझे आईवडील आहेत, आणि माझी मुलगी आहे, म्हणून शांतता ठेवा असं वागू नका अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी महिला आंदोलकांना केली.

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील हे दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिल्व्हर ओकवर पोहोचले, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती होती, दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी याविषयावर फोनवर चर्चा केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे सरकारविरोधी आणि अज्ञातशक्ती असल्याचं म्हटलं आहे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या हल्ल्याच्या पाठीमागे तसेच अशा कारवायांमागे अज्ञात शक्ती असल्याचं म्हटलं आहे.

सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपावरुन १०७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर मुंबई सीएसएमटीसमोरील आझाद मैदानात मागील ५ महिन्यापासून आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलिसांचा गराडा दिसू लागला, यावेळी पोलिसांनी आझाद मैदानात ध्वज संचलन केलं. आझाद मैदान लवकरात लवकर खाली केली जाण्याची चिन्हं यावेळी दिसून आली. यानंतर आझाद मैदान खाली करुन सील करण्यात आले आहे.

मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं ५ महिन्यापासून आंदोलन सुरु आहे, या आंदोलनाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते हे वकील करीत आहेत, शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर एसटी संपकऱ्यांना सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याच्या संशावरुन सदावर्ते यांना पोलिसांनी त्यांच्या घरुन ताब्यात घेतलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे, एसटी आंदोलनकांना चिथावणी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेत होते, तेव्हा मला कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेण्यात आले आहे, हा माझ्या हत्येचा कट आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.