आज दि.८ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

एसटी कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी, चप्पल फेक

राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे आज महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या घराच्या आवारात शिरले. संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चप्पलफेक केली.

आंदोलकांनी शांत व्हावे
चर्चेला मी तयार : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी विनंती आहे. मी त्यांना नम्रपणे विनंती केलेली आहे. मी आत्ता त्यांच्याबरोबर ह्या क्षणी बसायला तयार आहे. पण त्यांनी शांततेचा मार्ग धरावा. दगडफेक आणि चपला आमच्यावर फेकून काहीही होणार नाहीये. माझे आईवडील, माझी मुलगी घरात आहेत. पहिली त्यांची सुरक्षितता मला बघू द्या. मी पुन्हा एकदा सांगतेय की मी ह्या क्षणी त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. पण या वातावरणात चर्चा होणार नाही. या तुम्ही शांततेत बसा मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे. माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. माझे आईवडील आणि मुलीला मला भेटून येऊ द्या…मी दोनच मिनिटात तुमच्याशी बोलते”.

खानदेश विदर्भात पुढील 5 दिवस
उष्णतेचा येलो अलर्ट

विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा चटका वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेचा चटका वाढला आहे. पुढील पाच दिवस येथे उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

इम्रान यांना शनिवारी अविश्वास
प्रस्तावाला सामोरे जावे लागणार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा धक्का दिला. इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा ‘नॅशनल असेंब्ली’ च्या उपसभापतींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला़ आता इम्रान यांना शनिवारी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार असून, सत्तांतराचे स्पष्ट संकेत आहेत. इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव उपसभापती कासीम सुरी यांनी ३ एप्रिल रोजी रद्द केला होता़.

लोडशेडिंग टाळण्यासाठी
वीज खरेदीचा प्रस्ताव

राज्यात सध्या विजेची वाढती मागणी आणि त्यासोबत निर्माण झालेली कोळसा टंचाई यामुळे भर उन्हाळ्यात भारनियमनाचं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे आता बाहेरून वीज खरेदी करण्याच निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

आसाराम बापूंच्या आश्रमात
मुलीचा मृतदेह आढळला

उत्तर प्रदेशातील गोंडा इथल्या आसाराम बापूंच्या आश्रमात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये हा मृतदेह सापडला. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत मुलगी 4 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, त्यानंतर तिचा मृतदेह आसाराम बापूंच्या आश्रमात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या एका कारमधून सापडला.

पुण्यात राज ठाकरे.. मुर्दाबाद वसंत
मोरे झिंदाबादच्या घोषणा

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करत आपण अशाप्रकारे मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावणार नाही असं म्हटलं होतं. मोरे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना काही तासांमध्ये शहर अध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आलं. त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सर्व घडामोडी घडत असताना पुणे शहरातील मुस्लिम समाज असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘राज ठाकरे मुर्दाबाद’ बरोबरच ‘वसंत मोरे जिंदाबाद’ च्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आणखी एका साथीच्या
आजाराने दार ठोठावलं

गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. कोरोनाची लाट थांबत नाही तोच आता आणखी एका साथीच्या आजाराने दार ठोठावलं आहे. या आजाराची लक्षणंही कोरोनासारखीच आहेत. त्यामुळेच सुरुवातीला नेमका कोणता आजार आहे हे कळणं कठीण झालं आहे. कोरोना व्हायरसची तीन सामान्य लक्षणं आहेत. यात रुग्णांमध्ये खोकला, चव आणि वास न येणं आणि ताप ही तीन लक्षणं दिसतात.

एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांनी
सुरू केले आशियातील पहिले कॅफे

एचआयव्ही ग्रस्त लोकांना नोकरी मिळणे अत्यंत अवघड असते. काही संस्था आणि संघटना अशा लोकांसाठी काम करत असतात. अशातच आता अशा लोकांसाठी एक कॅफे सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कॅफेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांकडून चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या कॅफेचं नाव ‘कॅफे पॉझिटिव्ह’ असे आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी जागरुकता निर्माण करणे आणि रोजगार निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. हे कॅफे आनंदघर स्वयंसेवी संस्था चालवते. कल्लोल घोष यांनी त्याची स्थापना केली आहे.

बॉम्बसारखा फुटला AC; रात्री गाढ झोपेतच अख्खं कुटुंब संपलं!

कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यात एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. येथील मरियम्मनहल्ली गावात शुक्रवारी एअर कंडीशनरमध्ये झोपलेल्या कुुटुंबाचा मृत्यू झाला. हे वृत्त गावात पसरताच खळबळ उडाली. या घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या दोन लहान मुलांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचं नाव वेंकट प्रशांत (42), त्याची पत्नी डी. चंद्रकला (38), मुलगा अद्विक (6) आणि मुलगी प्रेरणा (8) आहेत. घरात राहणारं आणखी एक दाम्पत्य पळून जाण्यात यशस्वी झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस लिक झाल्यानंतर एसीमधून विजेचं शॉर्ट सर्किट झालं.

इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सना झटका! रील्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईत कपात

फोटो शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मेटाच्या मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. नवनवीन फीचर्स देऊन युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देण्यास सतत प्रयत्नशील असणाऱ्या इन्स्टाग्रामनं आता मात्र, एक पाऊल मागे घेतलं आहे. इन्स्टाग्रामनं आपल्या क्रिएटर्सच्या पेमेंटमध्ये 70 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात निर्णय घेतला आहे. याशिवाय मॉनिटायझेशनसाठी आवश्यक असलेलं टारगेटदेखील वाढवण्यात आलं आहे. द फायनॅन्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार क्रिएटर्सना कंपनीकडून प्रत्येक व्ह्यूसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत 70 टक्क्यांची कपात करण्यात आली असून, आता क्रिएटर्सना व्हिडीओतून पैसे कमवण्यासाठी लाखो व्ह्युज मिळवणं गरजेचं झालं आहे. तेवढे व्ह्यु त्यांच्या व्हिडीओंना मिळाले तरच कंपनीकडून त्यांना पैसे मिळू शकतील.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार” – गृहमंत्री

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा हायकोर्टाने बजावले आहे. कामावर रुजू होण्याची सूचना हायकोर्टाने काल (7 एप्रिल) दिल्या. मात्र, त्यानंतर आज दुपारच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थाना बाहेर जमा झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या आंदोलनानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

RCB विरुद्ध मुंबई टीम बदलणार, धमाका करणाऱ्याला संधी!

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. दिल्ली, राजस्थान आणि केकेआरने मुंबईला धक्का दिला. आता मुंबईचा पुढचा सामना शनिवारी आरसीबीविरुध्द पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार आहे. या मॅचसाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये बदल करेल हे निश्चित मानलं जात आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.