भारतीय न्यायव्यवस्थेत इतिहास घडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं ज्येष्ठ वकिल सौरभ कृपाल यांना दिल्ली हायकोर्टाचे जज बनवण्याची शिफारस केलीय. ह्या शिफारशीवर शिक्कामोर्तब झालं तर ते देशातले पहिले समलैंगिक जज होतील. फक्त न्यायव्यवस्थेसाठीच नाही तर देशासाठीही हा एक ऐतिहासिक निर्णय असेल. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं एखाद्या गे व्यक्तीला जज करण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतलाय. हा निर्णय भारतीय समाज व्यवस्थेसाठीही क्रांतीकारक ठरण्याची चिन्हं आहेत.
सुप्रीम कोर्टानं जे स्टेटमेंट जारी केलंय, त्यात असं म्हटलंय की, 11 नोव्हेंबरला कॉलेजियमची बैठक झाली आणि त्यात सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. विशेष म्हणजे माजी सरन्यायधीश एसए बोबडे यांनी केंद्र सरकारकडे कृपाल यांना जज बनवण्यावर विचारणा केली होती. त्यावर केंद्रानं मत स्पष्ट करावं असही बोबडे म्हणाले होते. बरं असही नाही की, सौरभ कृपाल यांच्या नावाची पहिल्यांदाच शिफारस होतेय. यापूर्वीही 4 वेळेस विचारविनिमय झाला पण मतभेद उघड झाले. 2017 मध्ये पहिल्यांदा सौरभ कृपाल यांना जज बनवण्याची शिफारस केली गेली होती.
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय. तर ऑक्सफर्डमधून त्यांनी लॉची डिग्री घेतलीय. लॉमध्येच पोस्ट ग्रॅज्युएट कृपाल यांनी केंब्रिजमधून पूर्ण केलंय. गेल्या दोन दशकापासून ते सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करतायत. यूएनसोबतही कृपाल यांनी जिनेव्हात काम केलंय. सौरभ कृपाल यांनी जे महत्वाचे खटले लढले त्यात नवतेजसिंह जोहर विरुद्ध भारत सरकारचा समावेश आहे. तसच कलम 377 हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याचे ते वकिल होते. 2018 मध्ये हे कलम रद्द केलं.