कोरोना कालखंडानंतर देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे पहायाला मिळत आहे. सेवा आणि वस्तुंच्या उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वस्तुंचे उत्पादन वाढल्याने पुन्हा एकदा नव्या दमाने निर्यातीला सुरुवात झाली आहे. भारत चालू आर्थिक वर्षात मार्चपर्यंत निर्यातीमध्ये 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल असा विश्वास उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. या सोबतच आपण याच कालावधीत 150 अब्ज डॉलरच्या सेवांची देखील निर्यात करू असे देखील गोयल म्हणाले आहेत.
पुढे बोलताना गोयल म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी निर्यातीचे प्रमाण चांगले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतात 27 अब्ज डॉलरची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 62 टक्क्यांनी अधिक आहे. भारत हा जगातील एक प्रमुख पुरवठादार देश आहे. जगातील अनेक देश हे विविध वस्तूंसाठी भारतावर अवलंबून असतात. त्यामुळे आपण पुढील काही महिन्यात निर्यातीचा एक विक्रमी टप्पा गाठणार आहोत.
गेली दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट आहे, कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी जगभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद होते. वस्तुंचे उत्पादनच बंद झाल्याने निर्यात देखील थंडावली होती. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. देशात लसीकरणाला देखील वेग आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व उद्योगधंदे जोमाने सुरू झाले आहेत. वस्तुंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे निर्यात देखील वाढली आहे. कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार गमावले होते. मात्र आता नोकऱ्यांबाबत देखील सकारात्मक चित्र निर्माण झाले असून, अनेकांना आपले रोजगार परत मिळाल्याचे देखील गोयल यावेळी म्हणाले.