पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
एसटी कर्मचा-यांचं पवारांच्या घराबाहेरचं आंदोलन चिघळल्यानंतर सुप्रिया सुळे तातडीनं सिल्व्हर ओकवर पोहोचल्या. सुप्रिया सुळेंनी अक्षरशः हात जोडून आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. पण आंदोलक शांत झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी 100 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कुणी जर चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. तातडीनं तुमच्यापैकी अनेक सहकारी इथं पोहोचले. त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत, हेच तुम्ही दाखवून दिलंत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे