एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रागाच्या भरात आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्यामुळे नवी मुंबईत सध्या तणावाचे वातावरण आहे. माथेफिरु निवृत्त पोलीस अधिकाऱ्य़ाचे नाव भगवान पाटील असून मुलगा विजय पाटील याचा मृत्यू झाला आहे. मृत मुलावर एरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात सुरू होते. ऐरोली येथे हा प्रकार घडला होता. माथेफिरु पिता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
भगवान पाटील या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली होती. भगवान पाटील या माथेफिरू निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला गोळीबारात तब्बल तीन गोळ्या लागल्या होत्या. घटना घडली तेव्हा भगवान पाटील याने आपल्याच मुलावर गोळीबार का केला ? हे समजू शकलेले नव्हते. मात्र, गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला होता, असे आता सांगण्यात येत आहे. पैशांचा वाद नंतर टोकाला गेल्यामुळे भगवान पाटील या पित्याने मुलगा विजय पाटीलवर गोळ्या झाडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील एरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत. विजय पाटील हा त्यांचा मुलगा असून तो सध्या वसईला राहतो. त्याला भगवान पाटील यांनी तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय पाटील तसेच दुसरा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.
आधीही भगवान पाटील यांच्याकडून असेच कृत्य
भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.