राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर वॉरचा दुसऱा अध्याय सुरु झाला आहे. मुंबईतल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन दोन दिवसाचं अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. महिला सुरक्षेचा विषय राष्ट्रव्यापी आहे, त्यामुळे राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामुळे भाजप महिला आघाडी आक्रमक झाली असून मंत्रालयाबाहेर भाजप महिला आघाडीने पत्राची होळी केली. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार भारती लव्हेकर आणि आमदार मनीषा चौधरीही उपस्थित होत्या.
राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना राज्यातील महिलांनी राज्यपालांकडे ज्या भावना पोहचवल्या होत्या, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर अतिशय दुर्देवी आहे, राज्यातील पीडितांची थट्टा उडवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी केल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
इतर राज्याचे दाखल देत असताना आपल्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, ही शिवशाही नाही तर मोगलाई आहे, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप असलेल्या मंत्र्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही, ज्या राज्यात आम्ही राहतो, त्या राज्यातील महिलांची अवस्था किती बिकट आणि वाईट आहे, याकडे ठाकरे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.