सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने स्वत:चा आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नवा रेल्वेमार्ग लवकर आणि वेळेत मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या माध्यमातून तीर्थक्षेत्र तुळजापूर प्रथमच रेल्वेने जोडले जाणार आहे.
देशातील सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांना दळणवळणाने जोडण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. सोलापूर जिल्हा व परिसरात पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्रे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन जोडण्यात आली आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर ही तीर्थक्षेत्रे रेल्वेमार्गानी जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी मातेचे तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर आतापर्यंत आले नव्हते. महाराष्ट्रासह आसपासच्या प्रांतांतील भाविकांसाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र महत्त्वाचे आहे. हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या तीन-चार दशकांपासून केली जात होती. मराठवाडा भागात रेल्वेचे जाळे तुलनेने खूपच कमी आहे. यापूर्वी लातूर-बार्शी-कुर्डूवाडी-मिरज दरम्यानचा रेल्वेमार्ग मीटरगेज स्वरूपाचा होता. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्या कार्यकाळात या मीटरगेज रेल्वेमार्गाचे रुंदीकरण होऊन ब्रॉडगेज करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांना मुंबईला रेल्वेने प्रवास करण्याची सोय झाली. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या जाळय़ात येण्याची मागणी मात्र आतापर्यंत दुर्लक्षित होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारने सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली. याबाबत सर्वेक्षणही झाले होते. चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने या नव्या रेल्वेमार्गासाठी प्रतीकात्मक स्वरूपात २० कोटीं रुपयांचा निधी तरतूद केला होता.
या नव्या रेल्वेमार्गाची लांबी ८४.४४ किलोमीटर आहे. या नव्या रेल्वेमार्गादरम्यान एकूण दहा रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ३३ गावांतून हा नवा रेल्वेमार्ग जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर असताना निधीअभावी अडचणीही आहेत. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी एकूण ९०४ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात राज्य सरकारचे ५० टक्के योगदान आहे. राज्य सरकारने आपला संपूर्ण आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरकरांसह तुळजापूर आणि उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ासह दक्षिण भारताला जोडणारा म्हणून हा नवा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी दूरच्या भागातून लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरला येतात. नवरात्र महोत्सवात तुळजापुरात मोठी यात्रा भरते. ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख पाच यात्रांपैकी एक महत्त्वाची यात्रा समजली जाते. नव्या रेल्वेमार्गाने तुळजापूर जोडण्याचा मार्ग आता सुलभ झाल्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना रेल्वेने येणे अधिक सोयीचे होणार आहे. याशिवाय तुळजापूर परिसरात तसेच विकासापासून सदैव दूर राहिलेल्या उस्मानाबादमध्ये नवीन उद्योग, व्यवसाय वाढण्यासाठी मदत होणार आहे.