निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी त्यांचे वृद्धावकाळाने निधन झाले.
डॉ. माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. केली. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मार्च 1993मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली.
तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं होते. या आधी ते महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर जबाबदारी सांभाळली. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.
माधव गोडबोले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा आहेत.