व्यायामशाळा, निर्जन कारखाने, खाणी, शाळा, जुने वायुनिर्मिती प्रकल्प अशा विचित्र ठिकाणांनाच रंगमंच करून तेथे नाटक सादर करण्याची किमया साध्य केलेले आणि जगातील सर्वात प्रयोगशील नाटय़दिग्दर्शकांपैकी एक असलेले पीटर ब्रुक यांचे शनिवारी पॅरीस येथे देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते.
ब्रुक यांनी शेक्सपियरच्या आव्हानात्मक नाटकांपासून ते महाभारताच्या नाटय़रूपांतरापर्यंतच्या प्रयोगांसाठी ‘रिकाम्या जागां’चा रंगमंच म्हणून वापर करण्याचा अफलातून आविष्कार घडवला. त्यांनी शहरांतील व्यायामशाळा, विद्यालये, कारखाने, खाणी, इतकेच नाही तर जुने वायुनिर्मिती प्रकल्प या ठिकाणांचा वापर रंगमंच म्हणून केला.
१९७० मध्ये शेक्सपियरच्या ‘ए मिडसमर नाईटस् ड्रीम’च्या प्रयोगात संपूर्ण पांढऱ्या रंगाचे नेपथ्य आणि चमकदार रेशमी वेशभूषेतील कलावंतांनी सर्कशीतील प्लेट-स्पिनिंग कौशल्याचा वापर करून घडवलेला अफलातून नाटय़ाविष्कारामुळे ब्रुक यांचे नाटय़ेतिहासातील स्थान निश्चित झाले. या नाटकाचे नेपथ्य सॅली जेकब्स यांनी केले होते. सुंदर जंगल आणि अथेनियन कोर्टच्या पारंपरिक ‘ड्रीम सेट’ची जागा ब्रुक यांच्या कल्पनेतून आलेल्या पांढऱ्या रंगातील नेपथ्याने घेतली.
ब्रुक यांचा नाटय़वर्तुळात दरारा होता, मात्र त्यांनी व्यावसायिकता नाकारल्यामुळे ते या क्षेत्रात लौकिकार्थाने कमी प्रसिद्ध होते. सतत नवकल्पनांच्या शोधात असलेल्या ब्रुक यांनी आणखी काहीतरी वेगळे करण्यासाठी देश सोडला. १९७० मध्ये ब्रिटन सोडून ते पॅरिसमध्ये दाखल झाले. तेव्हापासून ते तेथेच होते. ‘ल मॉँद’ या फ्रेन्च वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ब्रुक १९७४ पासून फ्रान्समध्ये होते आणि शनिवारी पॅरिसमध्ये ते निवर्तले. ते नव्वदीतही सक्रिय होते.