महाराष्ट्रासाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंचे निकटवर्तीय असलेले मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतंच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या पाठिमागे आता ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार संजय पांडे यांना येत्या 5 जुलैला म्हणजेच मंगळवारी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजावला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे संजय पांडे यांना बजावण्यात आलेल्या समन्सने राज्याच्या राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येण्याची दाट शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
संजय पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चं आयटी ऑडिट फर्म सुरु केलं होतं. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावं लागलं. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचं संचालक केलं होतं. या फर्मचं Isec Services Pvt Ltd असं नाव होतं. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.
संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते राज्याचे पोलीस महासंचालक देखील होते. पण काही तांत्रिक आणि कायदेशीरबाबींमुळे त्यांची पोलीस महासंचालक पदावरुन मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते नुकतेच तीन दिवसांपूर्वी 30 जूनला मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे.