सातारा पोलिसांची वारीत सेवा, वारकऱ्याच्या वेषात पकडले वारीतील 44 चोरटे

पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी  हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला  सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.

सातारा पोलीस वारकरी वेशात

श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी ऐतिहासिक फलटण शहरात मुक्कामी होती. 21 जूनला विठूनामाच्या गजरात ज्ञानोबारायांची पालखी प्रस्थान करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. माऊलींची पालखी आता सातारा जिल्ह्यातून प्रवास करतेय. माऊलींचा मुक्काम फलटण शहरातील विमानतळ मैदानावर असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वारकऱ्यांच्या वेषात फिरणाऱ्या तसेच संशयित रित्या फिरणाऱ्या चोरट्यांना लक्ष करून कारवाई करण्याचे काम केले. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व कर्मचारी हे या ठिकाणी वारकरी वेशातच पाहायला मिळाले. वारकरी वेषात पोलिसांनी लोणंद पासून फलटणपर्यंत 44 चोरटे पकडले. यामध्ये नऊ महिलांचा समावेश आहे.

माऊलींची पालखी मार्गस्थ –

यंदा सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम सहा दिवस आहे.काल सकाळी हा पालखी सोहळा फलटणहून बरड येथे मार्गस्थ झाला. या मुक्काच्या कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जागेवरच औषधोपचार केले जात आहेत.

मार्गात बदल –

वारीच्या निमित्ताने येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यासंबंधिचे ट्विटही सातारा पोलिसांनी केले आहे. नातेपुतेकडून फलटण तसेच फलटण ते नातेपुते दिशेने होणारी सर्व वाहतुक बंद आहे. फलटण ते लोणंद, फलटण ते दहिवडी , फलटण ते सातारा वाहतुक चालू आहे असे सातारा पाेलीस दलाने कळविले आहे.

यावर्षी 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली असून पंढरपुरकडे मार्गक्रमण केले आहे. आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात.

हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा करून उपवास करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.