अगदी सिनेमात घडावे तशी घटना डोंबिवलीमध्ये घडलीय. अतिशय सुरक्षित असणाऱ्या बॅंकेच्या सेफ चेस्टमधून तब्बल 34 कोटी रुपये एका पठ्ठ्याने लांबवले. पण त्यापैकी 12 कोटी 20 लाख रुपयेच तो नेवू शकला. या 12 कोटींपैकी 5 कोटी रुपये देखील तो मित्राकडेच विसरला आणि 7 कोटी रुपये घेवून हा चोर अद्यापही फरार आहे. पण त्याने केलेल्या बॅंक चोरीमुळे फक्त भारतातीलच नाही तर जगातील अनेक बॅंकांची झोप उडाली आहे.
डोंबिवली MIDC मधील ICICI बॅंकेत चोरी झाली आहे. या चोरीची चर्चा जगभर सुरु आहे. कारण चोरीच तशी झालीय. चर्चा आहे ती या बॅंकेतून किती पैसे चोरीला गेली याची नाही, तर पैसे कसे चोरले याची. कारण चोरी ही बॅंकेच्या चेस्टरुममधून झालीय. ही अशी रुम असते ज्यातून पैसे चोरी करणे जवळपास अशक्य असते. या चेस्टरुममध्ये फक्त तेच लोकं जावू शकतात ज्यांना परवानगी असते. पण ते देखील 1 नवा पैसा या चेस्टरुममधून बाहेर नेवू शकत नाहीत. तरी देखील चोरी केलीच कशी? हा प्रश्न ठाणे पोलिसांनाही पडलाय. कारण ही चोरी करणारा अलताफ नावाचा तरुण अजूनही फरार आहे.
अलताफ हा तरुण याच ICICI बॅंकेतील चेस्टरुममध्ये कस्टोडीयन म्हणून कामाला होता. गेली 9 वर्षे तो याच पदावर काम करत होता. या बॅंकेतील चेस्ट रुमबाबत एकूण एक माहिती अलताफला होती. पण असं असून सुद्धा पैसे चोरी करणे कठीण होते. कारण या चेस्टरुममध्ये साधी सुई देखील आत नेता येत नव्हती की बाहेर नेता नव्हती. त्याने त्याच्या मुंब्रा येथील तीन साथीदार इसरार अबरार हुसेन कुरेशी, शमशाद अहमद रियाज अहमद खान, अनुज प्रेमशंकर गिरी यांच्याकडे चोरलेले पैसे लपवून ठेवले होते.
बॅंकेची चेस्ट रुम ही खुपच सुरक्षित असते. सुरक्षेकरता विशेष प्रशिक्षित सरकारी पोलीस बाहेर असतात. चेस्ट रुमच्या आत जाताना पायातले मोजे, रुमाल हे देखील तपासले जातात. एक रुपया देखील रुमच्या आत घेवून जाता येत नाही, मग आतून घेवून येण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाहीत. विशिष्ट सिमेंटच भिंत, त्याच्या आत 12 मिमीची हार्ड कोअर स्टीलची प्लेट आणि परत विशिष्ट सिमेंटची भिंत अशी सुरक्षा चेस्ट रुमची असते. रुममध्ये काहीही काम करायचे असल्यास बायोमेट्रीक पद्धतीचा वापर करावा लागतो. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर चेस्टरुम बंद होते ते सकाळी 11 वाजता उघडते. तोपर्यंत कोणालाच त्या चेस्ट रुममध्ये प्रवेश नसतो. चारही बाजूला इन्फ्रारेड सेंसर कॅमेरे लावलेले असतात.
इतकी सुरक्षा भेदून अलताफने चोरी केली आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून 12 कोटी 20 लाख रुपये चोरले. अलताफने 9 जुलैच्या रात्री काही वेळा करता सर्व सुरक्षा यंत्रणा बंद केली होती. बायो मेट्रिकचा वापर न करता तो चेस्ट रुमच्या आत शिरला होता. त्याने 2 हजार कोटींमधून 34 कोटी रुपये चोरले. जे पैसे त्याने चोरले ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून बाहेर काढण्याकरता त्याने एक होल तयार केला होता जिथून पैसे थेट चेस्ट रुमच्या मागे कचऱ्यात पडत होते. बाहेर काढलेले पैसा तीन मित्राच्या मदतीने अलताफ घेवून गेला.
सुट्टीच्या दिवशी तर चेस्ट रुममध्ये जाणे अशक्यच आहे आणि धक्कादायक म्हणजे 1 सेकंद देखील चेस्ट रुमची सुरक्षा बाधित झाली तर सर्व यंत्रणांना अलर्ट जातो. असं असताना अलताफ आत गेला कसा? बाधित यंत्रणेचा अलर्ट का आला मिळाला नाही? पैसे चोरी झालेत हे जेव्हा अलताफ फरार झाला तेव्हाच कसे बॅंकेच्या लक्षात आले? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. याच प्रश्नांमुळे अनेक बॅंकांची झोप उडाली आहे.