उद्योगनगरी नाशिक जवळ तब्बल 100 एकरवर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. त्यासाठी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अलबलगन यांनी परिसरात कुठे जागा आहे, याचा अहवाल पाठवा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. त्यासाठी सिद्धपिंप्री शिवारातील जागेचा विचार करण्यात येत आहे.
या जागेशेजारीच शासनाची इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब साकारली जातेय. त्यामुळे उद्योगासाठीही हे स्थळ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. यात प्रकल्पातून जवळपास 10 हजारांची रोजगार निर्मिती (Jobs) होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अलबलगन यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलबलगन यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना या प्रकल्पासाठी शहरात कोणती जागा आहे, याची विचारणा केली आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनीही या प्रकल्पाबाबत दुजोरा दिलाय. माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात इलेक्ट्रिक उद्योगाचे क्लस्टर यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिद्धीपिंप्री भागात 250 एकर शासकीय जागा आहे. येथून विमानतळ, रेल्वे स्टेशन, महामार्ग जवळ आहे. या जागेशेजारीच शासकीय इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहे. ही जागा या प्रकल्पासाठी अतिशय योग्य राहील. त्यामुळे किमान दहा हजार तरी रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळाली, तर कामाला गती येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यात येणारे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मोठे फायद्याचे ठरणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जिल्ह्यात कित्येक तरुण आधीच बेरोजगार आहेत. येणाऱ्या काळातही सरकारी नोकऱ्यांच्या संध्या अपेक्षेप्रमाणे किती तरी पटीने कमी आहेत. हे पाहता असे छोटे-मोठे प्रकल्प येणे नाशिकसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योगनगरीची भरभराट होईल. शिवाय राज्यातील हजारो बेरोजगारांच्या नोकरीची भ्रांत त्यामुळे मिटणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.