मद्य आणि वाइनच्या शौकिनांसाठी आता एक खूशखबर. आयुर्वेदात ज्या जांभळाचे नाना प्रकारे महत्त्व सांगण्यात आले आहे. विशेषतः मधुमेह, हृदयविकार, पचनावर अतिशय गुणकारी मानल्या जाणाऱ्या जांभळापासून आता नाशिकमध्ये वाइन निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधवांच्या पोटापाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. खरे तर फळापासून वाइन निर्मिती करण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. रासवेरा जांभूळ वाइन लाउंजने त्यासाठी पुढाकार घेतलाय. या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे नाशिकच्या पर्यटनात अजून भर पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिकची वाईन निर्मितीत वेगळीच ओळख आहे.
नाशिकमध्ये पहिली वायनरी चक्क 35 वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि तिथूनच नाशिकचे नाव वाइन कॅपिटल (Capital) म्हणून ओळखायला सुरुवात झाली. सध्या देशातील सर्वाधिक वायनरी नाशिकमध्ये आहेत. येणाऱ्या काळात यात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात सध्या जवळपास 42 वायनरीज आहेत. त्यापैकी 22 वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच ‘नाशिक व्हॅली वाइन’ला केंद्र सरकारचे महत्त्वाचे असे भौगोलिक मानांकनही (जीआय) मिळाले आहे. कोणालाही वाटेल की येथेच कसा काय वाईन निर्मितीचा उद्योग फोफावला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाशिकचे अतिशय थंड असणारे आणि वाइनला पोषक असणारे तापमान. शिवाय दळवळणाच्या दृष्टीने मुंबई-पुणे हाकेच्या अंतरावर. त्यात मोठ्या प्रमाणात होणारी द्राक्ष लागवड. जिल्ह्यात जवळपास दीड ते पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांची लावगड होते. त्यात अनेक शेतकरी वाईनसाठी उपयोगी असणाऱ्या द्राक्षांची आवर्जुन लागवड करतात.
जांभळापासून वाइन निर्मितीचा पहिला प्रयत्न 2013 मध्ये महाबळेश्वरच्या जंगलात झाला. मात्र, नाना अडचणींमुळे त्यात खंड पडला. त्यानंतर 2018 आणि 2019 मध्ये कॅनडातही जांभळापासून मद्य निर्मिती केली गेली. त्यात खनिजे, जीवनसत्त्वे, रेझव्हेरट्रॉ, ऍन्टी-ऑक्सिडेंट सापडले. या वाइनला ‘रेसवेरा’ नाव दिले. या मद्याची निर्मिती करताना जांभळाच्या बियाणापासून लगदा वेगळा केला जातो. त्यामुळे या बियाणांचा लागवडीसाठी उपयोग होतो.
जांभूळ वाइन दोन फ्लेवरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात शुद्ध जांभळ्या रंगासह डीप रुबी रेड वाइन आणि दुसरा फ्लेवर डीप रोझ वाइन आहे. या वाइन निर्मितीसाठी कोकण, सह्याद्री, नाशिक आणि इतर भागात पिकलेल्या जांभळाचा वापर करण्यात येणार आहे. जांभळाचे रेफ्रिजरेशन करणे शक्य नसते. त्यामुळे वेगळा प्रयोग करून या वाइनची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वाइन प्रेमींसाठी ही खास भेट असणार आहे.