‘ रम्य ही स्वर्गाहून लंका हिच्या किर्तीच्या सागर लहरी नादविती डंका ’ अशी अजरामर किर्ती लाभलेल्या, ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्णनगरी म्हणून जिचा जयजयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला त्या श्रीलंकेची अवस्था आज भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणि चीनच्या कर्ज योजनेत अखंड बुडालेल्या श्रीलंकेची अवस्था वाईट आहे. सध्या या कर्जाच्या खाईतून वर येण्याचा कुठलाच रस्ता श्रीलंकेकडे नाही. आर्थिक स्थिती बिघडल्याने या देशात महागाई सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे.
महागाईमुळे श्रीलंकन नागरिक हवालदिल झाले आहेत. रॉयटर्स च्या अहवालानुसार, रविवारी पेट्रोल-डिझेलसाठी लोकांना अनेक तास वाट पहावी लागली. या दरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला. श्रीलंकन पोलिसांच्या मते, दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिक इंधनाचा साठा करुन ठेवत आहेत. याच दरम्यान देशातील वेगवेगळ्या भागात इंधनाची वाट पाहत असलेल्या दोन नागरिकांनी जीव गमावला.
कोलंबो पोलीस विभागाचे नलिन थल्डुवा यांना दोन वृद्धांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. इंधनासाठी ते अनेक तासांपासून रांगेत उभे होते. त्यांचे वय 70 वर्षांहून अधिक होते. शुद्ध हरपल्याने त्यांचा मृत्यू ओढावला. वाढत्या इंधन किंमतींमुळे लोक इंधनाचा साठा करुन ठेवत आहेत. तर दुसरीकडे श्रीलंकेत वीज संकटही गंभीर झाले आहे. त्यामुळे लोक तासनतास पंपांवर वाट पाहत इंधन खरेदी करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार मरणारी एक व्यक्ती तीनचाकी रिक्षा चालक होती व त्यांचे वय 70 वर्षे होते. तर दुसरा नागरीक 72 वर्षांचा होता. दोघेही चार तासांपासून रांगेत थांबलेली होती. पेट्रोलियम जनरल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अशोक रानवाला यांनी सांगितले की, रविवारी देशातील कच्च्या तेलाचा साठा संपला. त्यामुळे येथील रिफाइनरी बंद करण्यात आली.
घरगुती गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याने सर्वसामान्य श्रीलंकन कुटुंबांनी रॉकेलचा आधार घेतला आहे.परिणामी घासलेट वा रॉकेलची मागणी प्रचंड वाढली आहे. Laugfs Gas ही श्रीलंकेतील सर्वात मोठी गॅस पुरवठादार कंपनी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12.5 किलोग्रॅमच्या सिलेंडरसाठी नागरिकांना 4.94 डॉलर म्हणजेच 1,359 रुपये मोजावे लागत आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त किंमत आहे.
महागाईचा अंदाजासाठी हे एक बोलके उदाहरण पुरेसे आहे. श्रीलंकेत शनिवारी 400 ग्रॅम दुध पावडरसाठी 250 रुपये मोजावे लागले. परिणामी मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला एक कप चहासाठी 100 रुपये मोजावे लागले. देशातील मुद्रा स्थिती प्रचंड घसरली. फेब्रुवारीतच मुद्रा भांडार 2.31 अरब डॉलरपर्यंत घसरला होता. तो आता 15.1 टक्क्यांवर घसरला आहे. जो आशिया खंडात सर्वाधिक आहे. तर अन्नधान्याची मुद्रास्थिती 25.7 टक्क्यांवर पोहचली आहे.