वेगवान चाली, अचूक पास आणि नियंत्रणाच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा जगज्जेत्या जर्मनीला नमवले. प्रो लीग हॉकीच्या परतीच्या लढतीत सोमवारी भारताने अभिषेक आणि सेल्वम कार्तिकने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर जर्मनीचा ६-३ असा पराभव केला. या विजयासह भारताने या स्पर्धेच्या गुणतालिकेत स्पेनला मागे टाकत अग्रस्थान मिळवले आहे.
भारतीय खेळाडूंनी जर्मनीच्या वेगवान खेळाला जशास तसे उत्तर दिले. भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण करतानाच बचाव भक्कम ठेवत आकर्षक विजय मिळवला. अभिषेक (२२ आणि ५१व्या मिनिटाला) व सेल्वम कार्तिक (२४ आणि ४६व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर जुगराज सिंग (२१व्या मि.), हरमनप्रीत सिंग (२६व्या मि.) यांनी एकेक गोल केला. जर्मनीसाठी टॉम ग्रॅमबूश (तिसऱ्या मि.), गोन्झालो पेईलट (२३व्या मि.) आणि माल्टे हेलविगने (३१व्या मि.) गोल केले.