वाशिममध्ये काँग्रेसला खिंडार! माजी मंत्री अनंतराव देशमुख शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये
वाशिम जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा त्यांची दोन मुले चैतन्य देशमुख आणि नकुल देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन लाटे, रिसोड नगराध्यक्ष विजयाताई आसनकर आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळं वाशिम जिल्ह्यासह रिसोड विधानसभेच्या राजकारणामध्ये मोठे बदल दिसणार असून भाजपाची ताकद वाढणार आहे.
Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भारताला पुन्हा धमकी
भारत पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डात सध्या आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. यंदाच्या आशिया कप पूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा आशिया कपचे आयोजन नक्की कुठे करायचे या विषयावर आयसीसीची बैठक ही येत्या 18 ते 20 मार्च रोजी होणार आहे. परंतु या आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठीयांनी याबाबत मोठे वक्तव्य केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषद घेतली . यात ते म्हणाले, “सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भारतीय संघ ज्या प्रकारे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, त्याच प्रकारे पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देईल, हा मुद्दा मी नक्कीच आयसीसीच्या बैठकीत मांडेन”, असे त्यांनी सांगितले.
ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी होणार का नाही? मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत असतानाच मुंबई हायकोर्टाने गौरी भिडे यांना धक्काही दिला आहे. याचिकाकर्त्याला मुंबई हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
काय होती गौरी भिडे यांची याचिका?
कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा काय झाला? प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय आहेत? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता, ज्यात साडे अकरा कोटी रुपयांचा नफा झाला. उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? या सगळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी केली होती.
आठवीतला अभय करणार ‘इस्रो’ची वारी
शालेय विद्यार्थ्यांनी ‘नासा’ (NASA) आणि ‘इस्रो’ (ISRO) या अवकाश संशोधन संस्था पुस्तकातूनच अभ्यासलेल्या असतात. पण बीडमधील शालेय विद्यार्थ्यांना या संस्था प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील 110 विद्यार्थ्यांतून 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून 11 विद्यार्थी ‘नासा’ तर 22 विद्यार्थी ‘इस्रो’ला जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील पालीच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अक्षय वाघमारे याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.
उद्धव ठाकरेंची खेळी अंगलट येणार? हरीश साळवेंचा कोर्टात मोठा दावा
‘राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही. गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचा निर्देश देऊ शकतात. सुप्रीम कोर्टात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाही’ असा युक्तिवाद करत हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही सर्वात मोठी चूक असल्याचे कोर्टात निदर्शनास आणून दिले.राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती.
हसन मुश्रीफांना दिलासा, अटक टळली, कोर्टाने ‘ईडी’गिरीला फटकारलं
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पण, आधीच मुश्रीफ यांना दिलासा दिला आहे, मग कारवाई कशाला करता? असा सवाल करत मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला फटकारून काढलं आहे. तसंच, 2 आठवडे कारवाई न करण्याचे निर्देशही ईडीला दिले आहे.
हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मूळ प्रकरणांत दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली. आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रिफांनी माहिती दिली.
सांगलीत रंगणार महिलांच्या महाराष्ट्र केसरीचा थरार! स्पर्धेच्या तारखा जाहीर
पुण्यात पारपडलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पाश्वभूमीवर आता महाराष्ट्रात ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या वाहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावण्याची राज्यातील महिला कुस्तीपटू जय्यत तयारी करीत आहेत. अशातच या स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.
महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा फक्त मॅट वरच खेळली जाणार असून या लढतीमधील अंतिम विजेत्याला हा ‘महिला महाराष्ट्र केसरी’ चा ‘किताब आणि मानाची गदा दिली जाणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात रंगणार असून 23 आणि 24 मार्च रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे राज्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. शासकीय कर्मचारी संपाचा या परीक्षेवर परिणाम झालेला नाही.जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या संपाचा परिणाम परीक्षांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत महासंघाने जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बारावीची आजची परीक्षा वेळेवर, कोणत्याही अडचणींविना सुरू झाली आहे.
भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य
सदासर्वकाळ निवडणुकांच्या तयारीत असलेला पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिले जाते. निवडणूकांचे योग्य नियोजन, उमेदवारांची निवड आणि मतदारसंघातील प्रश्नांवर वेळीच लक्ष घालत निवडणूक जिंकण्याकडे भाजपाचा कल असतो. ओडिशा राज्यात पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मार्च रोजी ओडिशा राज्यातील भद्रक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून २०२४ च्या निवडणुकीची पायाभरणी करण्यात येईल. तसेच आतापर्यंत सत्ताधारी असलेल्या बिजू जनता दलासोबत (BJD) असणारे सौहार्दपूर्ण संबंध बाजूला सारत निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती भाजपा नेत्यांनी दिली.
‘RRR २’ येणार; ऑस्करच्या यशानंतर दिग्दर्शक राजामौली यांची मोठी घोषणा!
‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि काल पार पडलेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय यंदाच्या ऑस्करसाठी उत्सुक होते. ‘आरआरआर’ चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे जगभरातुन कौतुक होत आहे.बाहुबली चित्रपटाने एसएस राजामौली प्रसिद्धीच्या झोतात आले. त्याआधी त्यांनी मगाधिरा, मक्खी या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच त्यांनी व्हरायटीला दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ऑस्करमुळे तुम्हाला आता प्रेरणा मिळाली असणार, आता पुढील भाग बघायला मिळणार का? त्यावर दिग्दर्शकाने उत्तर दिले “हो अर्थात, ऑस्कर मिळाल्यानंतर आता आम्ही जोमाने पटकथेच्या कामाला लागलो आहोत. बघू आता काय होतंय ते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
टीम इंडियाने रचला सर्वात मोठा विक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
बॉर्डर-गावसकर करंडक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या मैदानावर पार पाडला. हा चौथा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत २-१ असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १६ वी मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम एक विक्रम केला. भारताने सलग चौथी बॉर्डर-गावसकर करंडक जिंकला आहे.नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात, भारतीय संघाने २०१३ पासून सलग १५ कसोटी मालिका जिंकल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत करून आपला सलग १६ वा मालिका विजय नोंदवला. हे करत टीम इंडिया सलग १६ कसोटी मालिका जिंकणारा जगातील एकमेव संघ बनला आहे. जगातील इतर कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर सलग १० पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकलेल्या नाहीत. या बाबतीत भारत आधीच नंबर वन संघ होता.
SD Social Media
9850 60 3590