कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’, असे आपल्याला वागावे लागेल, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिला.
राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्यविषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये . त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना दिले.
येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर , उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी उद्योजकांना दिला.