आज दि.३० जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

एकनाथ शिंंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. “शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयेत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? ही भाजपची तात्पुरती सोय आहे का?

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता नवीन वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट एकत्र सत्ता स्थापन करतील. यात मुख्यमंत्री फडणवीस असतील असच सर्वांना वाटत होतं. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केल्याने उभ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. मात्र, यात एक घटनात्मक पेचही निर्माण झाला आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार अजूनही कोणत्याच पक्षात विलीन झालेले नाहीत. दुसरीकडे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्याचा निर्णय येणे बाकी आहे. त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार सेना आमदारांवर आहे. असं झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद अल्पायुषी ठरू शकते. म्हणून तर ही तात्पुरती सोय नाही ना? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावर आता सर्व अवलंबून आहे.

महाराष्ट्रातील बंडखोर शिवसेना आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्याने आता त्यांचीच खरी शिवसेना आहे. म्हणजे पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि प्रतिकांवर त्यांचाच अधिकार आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेत 55 पैकी 40 आमदार सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे, यापूर्वी अनेकदा पक्ष फुटल्यामुळे अशी प्रकरणे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहेत.

मुख्यमंत्री म्हणून घोषित होताच एकनाथ शिंंदेंनी घेतले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. फडणवीसांच्या या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व घेऊन पुढे निघालो आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

बच्चू कडूंच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाईल बंद – पुरावे नसल्याने पोलिसांचा निर्णय

अकोला जिल्ह्यातील रस्ते कामात कथित भ्रष्टाचार प्रकरणात पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांच्यावर वंचित आघाडीकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळून न आल्याने शहर कोतवाली पोलिसांनी चौकशीची फाईल बंद केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असताना दुसरीकडे बच्चू कडू यांना ‘क्लीन चिट’ मिळाली.

जिल्हा नियोजन समितीच्या रस्ते कामात पालकमंत्री बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता.

मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो”; देवेंद्र फडणवीस यांचं भर पत्रकार परिषदेत वक्तव्य

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. “भाजपाचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आमच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे. पाऊस खूप आहे, मांडव टाकलेला नाही. कुणालाही निमंत्रण जाऊ शकत नाही. छोटा शपथविधी सोहळा होत आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो. भाजपाचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील कुणालाही या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कुणीही येथे येण्याचा प्रयत्न करू नये.”

उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतरही गांधी-पवार यांचं मौन का?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बुधवारी दिला. या राजीनाम्याच्या वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आभार मानले. या दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत साथ दिली, असं ठाकरे यांनी सांगितलं. ठाकरेंच्या राजीनाम्याला आता 18 तासांचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानं याबाबत कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या नेत्यांच्या मौनाचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला जात आहे.महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका महत्त्वाची होती.पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी एकही ट्विट केलेलं नाही. पवारांच्या राज्यात सत्ताबदल होत असताना आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पायउतार होत असताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडूनही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही. राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांनी याबाबत सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पला भुस्खलनाचा तडाखा; 30 ते 40 जवान अडकल्याची भीती, 7 जवानांचा मृत्यू

मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 टेरिटोरियल आर्मी छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली आहे. या अपघातानंतर डझनभर जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. त्याच वेळी, 30-40 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

 ‘नाथांचा नाथ एकनाथ!’, शिवसेना आमदारांचा आनंद गगनात मावेना, गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते. हे सर्व नेते ‘नाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आता समोर देखील आले आहेत.

मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेचे लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात जसेच्या तसे कैद झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ हा अतिशय भीतीदायक असाच आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ होती आणि अचानक इमारत कोसळते. त्यामुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडते.या दुर्घटनेत किती नुकसान झालंय याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेत जीवितहानी झालीय का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. काळबादेवीत जी इमारत कोसळली ती चार मजली इमारत होती.

चंद्रपूर : तीन तासाच्या थरारानंतर घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद

संरक्षण भिंत ओलांडून बिबट्या चक्क घरात घुसल्याची घटना चंद्रपूर मधील सावली वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पाथरी येथे आज (गुरुवार) पहाटे घडली. दरम्यान, सावली येथील विभागाच्या चमूने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्या बिबट्याला जेरबंद केले. पाथरी येथील गोपाळ पाटील ठीकरे यांच्या घरामागे मोठे जंगल आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. घरात बिबट घुसल्याची माहिती होताच मोठी तारांबळ उडाली. बिबट्या घरात घुसल्याची बाब गावात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्याला बघण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली. दरम्यान, सावली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तसेच पाथरी पोलीस स्टेशनच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. दरबान पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश मोहोळ व सावली येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी व त्यांची चमू ठिकरे यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी घरातील सर्व मार्ग बंद करून एका मार्गावर पिंजरा लावून रेस्क्यू ऑपरेशन केले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबटला जेरबंद करण्यात यश आले.

अरे देवा! कोरोनानंतर आता Anthrax ची दहशत; कित्येक बळी घेतल्याने खळबळ

जगभरात कोरोनाव्हायरस अद्यापही थैमान घालतो आहे. त्यात मंकीपॉक्स आणि इतर काही आजारांचंही संकट आलं आहे. अशात आता आणखी एका आजाराने दहशत निर्माण केली आहे. हा आजार म्हणजे अँथ्रेक्स. ज्या केरळात देशातील कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळून आलं होतं, त्याच केरळात अँथ्रेक्सचा उद्रेक झाला आहे. कित्येक जीवांचा या आजाराने बळी घेतला आहे.केरळच्या अथिरापल्ली वनक्षेत्रात  रानडुकरांमध्ये अँथ्रेक्सचं संक्रमण आढल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली. या संसर्गामुळे कित्येक डुकरांचा मृत्यूही झाला आहे.

8 बायका आणि फजिती ऐका! एकाच वेळी सर्वांना सांभळताना नवऱ्याच्या नाकीनऊ

एक बायको सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं अनेक पुरुष गमतीनं म्हणतात; पण ब्राझीलमध्ये तर एका व्यक्तीनं एकाच कार्यक्रमात नऊ बायकांशी लग्न केलं. लग्न करताना या गोष्टीची इतकी चर्चा होईल, याची त्याला कल्पना नसावी. ब्राझीलमधील एक मॉडेल आणि प्रभावी व्यक्ती आर्थर ओ उर्सा यानं एका दिवशी नऊ स्त्रियांशी लग्न केलं. याची खूप चर्चाही झाली. मात्र त्यानंतर एका पत्नीला घटस्फोट दिला. या सगळ्या पत्नींना सांभाळणं कठीण गोष्ट असल्याचं आता तो म्हणतोय.

ब्राझीलचा मॉडेल आर्थरच्या नऊ लग्नांची चर्चा गाजली होती. त्यानंतर त्याच्या एका पत्नीनं सवतींसोबत नवऱ्याला वाटून घेणं आवडत नसल्याचं कारण देऊन घटस्फोट घेतला. काही दिवसांपूर्वी आर्थर एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आला होता. आठ पत्नींना गिफ्ट घेण्यासाठी तो आला होता. ब्राझिलियन व्हॅलेंटाइन्स डेसाठी ही गिफ्ट्स तो घेत होता. 12 जूनला तिथे व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातो.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.