आज दि.१५ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

उदय सामतांची ऑफर अन् बडा नेता शिंदे गटाच्या गळाला? रत्नागिरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रशांत यादव यांनी तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. चिपळूणमधून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रशांत यादव यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र आता त्यांनीच राजीनामा दिल्यामुळे हा काँग्रेससाठी जिल्ह्यात मोठा धक्का मनला जात आहे. प्रशांत यादव यांनी राजीनामा का दिला याचं कारण अद्याप तरी गुलदस्त्यात आहे, राजीनामा दिल्यानंतर प्रशांत यादव हे नॉटरिचेबल झाले आहेत.

चिंचवडमध्येही मनसेचा भाजपला पाठिंबा पण…

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्वीनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असा भाजपचा प्रयत्न होता. मात्र महाविकास आघाडीने दोन्हीकडे देखील आपला उमेदवार दिला आहे. मनसेने कसब्यात भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर चिंचवडमध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अखेर मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

चिंचवडमध्ये मनसेनं भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला आहे. मात्र पाठिंबा देताना मनसेने काही अटी देखील घातल्या आहेत. मनसेने जरी अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला असला तरी मनसेचे कार्यकर्ते अश्विनी जगताप यांचा सध्या प्रचार करणार नाहीत, या शर्तीवर मनसेने अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी माहिती दिली आहे. आज मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले ,  भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि इतर पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

भारतात भूकंपाची शक्यता, पण पंतप्रधान मोदींमुळे…. वाचा ज्योतिषी काय म्हणतात?

भारतात येत्या वर्षात भूकंप होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच कानपूरच्या प्रसिद्ध ज्योतिषी आणि टॅरो कार्ड रीडर नितीशा मल्होत्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, देशात भूकंप होण्याची शक्यता आहे, परंतु या संकटापासून वाचण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहे. नितीशा सांगतात, ‘खगोलशास्त्रीय योगामुळे देशात काही मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, ती भूकंपही असू शकते. पण पंतप्रधान मोदींच्या कुंडलीतील शुभयोग पाहता, या नैसर्गिक आपत्तीचा भारतापेक्षा शेजारील देशांना मोठा फटका बसेल.’ नितीशा यांच्या म्हणण्यानुसार, ‘यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी मेष राशीमध्ये 4 ग्रहांचा योग, नवं कुंडलीत सूर्य आणि चंद्र पृथ्वी तत्वाच्या राशीत असणं व मे महिन्यात चंद्रग्रहण असल्यामुळे भूकंप किंवा वादळाची शक्यता आहे.’ मात्र, या आपत्तीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीतच उपाय दडलेला असल्याचा दावा नितीशा यांनी केलाय.

भीमाशंकरवर आसामचा दावा

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केला आहे. पौराणिक मान्यतेनुसार शिवाची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. या ठिकाणी महादेवाचे दर्शन झाले होते आणि त्यामुळेच तेथे ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली असे मानले जाते. शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन महाराष्ट्रात आहेत. आता आसामने श्लोकात सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या ज्योतिर्लिंग भीमाशंकरवर दावा केला आहे.

तारीख पे तारीख.. सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी

शिवसेना कुणाची ?  या प्रश्नाचा निकाल कधी लागले याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी जोरदार बाजू मांडली. त्यानंतर  ‘राजकीय नैतिकता महत्त्वाची’ असते असं मत सरन्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच, रेबिया प्रकरण आणि या केसमधील घटनाक्रम वेगवेगळा आहे, असं निरीक्षणही घटनापीठाने नोंदवलं.

राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. यात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अॕड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा याबाबत सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे गटाची बाजू अॕड. हरीश साळवे मांडत आहे. सुनावणीसाठी ते लंडन येथून ऑनलाईन हजर झाले आहेत. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

चेतेश्वर पुजारा खेळणार 100 वा कसोटी सामना, घेतली पंतप्रधान मोदींची भेट

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीचा फोटो पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून मोदींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा कसोटी सामना  भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याचा करता फार खास असणार आहे. याच कारण म्हणजे हा पुजारा याचा 100 वा कसोटी सामना असेल. तेव्हा या निमित्ताने त्याने मोदींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्याची पत्नी पूजा ही देखील उपस्थित होती.

आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर 1

भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2023 या नवीन वर्षात संघ एकामागोमाग असे आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमधील सर्व सामने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला सामना देखील जिंकला. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे.

आयसीसीने नुकत्याच सुधारित केलेल्या टीम रँकिंग नुसार टी 20 फॉरमॅटमध्ये भारत 18,445 पॉइंट आणि 267  रेटिंग सह पहिल्या स्थानावर आहे. तर वन डे रँकिंगमध्ये देखील 5,010 पॉइंट आणि 114 रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे. तसेच टेस्ट रँकिंगमध्येही भारताने वर्चस्व राखले असून यात भारत 3,690 पॉईंट सह 115 स्थानी आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.