तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन (Lockdown) उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
शहरातील निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. आज सकाळपासूनच लोकांनी कामासाठी घराबाहेर पडायला सुरवात केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या ट्रॅफिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनलॉक मुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी ई-पास गरजेचा आहे. सध्या मुंबईला जाण्यासाठी मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणावर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील नाहीत, जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि 5 पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील.