ओमायक्रॉनचा भारतात पहिला बळी,
जयपूरमध्ये ७२ वर्षीय रुग्ण
झपाट्याने पसरणाऱ्या करोनाच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा भारतात पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिली. मृत ७२ वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह निघाला होता, त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली. परंतु स्वास्थासंबंधीत गुंतागुंतीमुळे तो रुग्णालयात दाखल होता. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की हा मृत्यू ओमायक्रॉनचाच मानला जाईल. ओमायक्रॉनची लागण झाल्यापासून रुग्णालयात दाखल होता.
आंदोलकांनी पंतप्रधानांचा
ताफा अडवला, सभा रद्द
हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता. गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती.
जे जे रुग्णालयातील ६१ निवासी
डॉक्टरांना करोनाची लागण
मुंबईत करोनाने कहर केला असल्याने आधीच चिंता वाढलेली असताना जे जे रुग्णालयातील ६१ निवासी डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून ही माहिती एएनआयला देण्यात आली आहे. आधीच निवासी डॉक्टरांची संख्या कमी असून करोनामुळे अनेकजण कर्तव्यावर नसताना यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे असं मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी सांगितलं आहे. पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.
अब्दुल सत्तार म्हणतात रश्मी ठाकरे
मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य टीव्ही ९ शी बोलताना केलं आहे. ते म्हणाले की, “रश्मी ताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. रश्मी ठाकरे पडद्याच्या पुढे नाहीत, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणापैकी बरंच राजकारण त्यांना माहिती आहे. त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत असतात. उद्धव साहेबांचा आदेश असला तर मला वाटतं काहीही होऊ शकतं आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतात. सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही त्या उत्तम काम करत आहेत,” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
पहिल्या डावात भारताने सर्व
गडी गमवून २०२ केल्या धावा
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने सर्वबाद २२९ धावा केल्या आणि २७ धावांचा लीड घेतला. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा २ गडी गमवून ८५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत. चेतेश्वर पुजाराला सूर गवसला आहे. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील त्याचं ३२ वं अर्धशतक आहे. लगेचच अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. दोघांनी शतकी भागीदारी केली आहे. दोघांची भागीदारी फोडण्यात रबाडाला यश आलं.
क्वारंटाईन राहण्याचा
कालावधी केला कमी
राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत असताना एकीकडे निर्बंध वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकारने काहीसा दिलासा देखील दिला आहे. केंद्र सरकारने करोनाबाधित आढळल्यानंतर क्वारंटाईन किंवा विलगीकरणात राहण्याचा कालावधी कमी केल्यानंतर त्या धर्तीवर राज्य सरकारने देखील क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल केला आहे. क्वारंटाईनच्या कालावधीमध्ये बदल करून तो कमी करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज सकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.
पाचही राज्यांमधल्या महत्त्वाच्या
प्रचारसभा पुढे ढकलण्याचा निर्णय
सध्या देशभरात राजकीय वर्तुळामध्ये ५ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. देशातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी उत्तर प्रदेशमधील निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केलेली असताना आता काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यांमधला विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आता काँग्रेसनं उचललेलं हे पाऊल चर्चेचा विषय ठरलं आहे. पाचही राज्यांमधल्या महत्त्वाच्या प्रचारसभा पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी एएनआयशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
सोलापूरनजीक घडलेल्या अपघातात
चार तरूणांचा जागीच मृत्यू
विजापूर-सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक पुलाच्या कठड्यावर कार आदळून घडलेल्या अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. सिंदगी (जि. विजापूर) येथील पाच तरूण कारने पुण्याकडे जाण्यासाठी निघाले होते. सोलापूर-विजापूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे.
अनाथांचा आधार हरपला,
सिंधुताई सपकाळ यांचे निधन
अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात दु:खद निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
घृष्णेश्वर मंदिर मालमत्तेवरून
वाद पेटला खंडपीठात याचिका
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि मालमत्तेवरून वाद पेटला आहे. मंदिर आणि मंदिराच्या 13 एकर 2 गुंठे मालमत्तेच्या मालकी हक्कात नाव दाखल करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सदर जमीन आपल्या पूर्वजांना अहिल्याबाई होळकरांनी दिलेली होती, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. आता कोर्टात यावर काय न्यायनिवाडा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला
लागा, उद्धव ठाकरे यांच्या सूचना
राज्याची राजधानी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख,नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत यांनी माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या लॉकडाऊनसारखी
परिस्थिती नाही : राजेश टोपे
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.
पुण्यातील शाळा
बंद करण्याचा निर्णय
मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची
संख्या थेट 831 वर, प्रशासनाचे धाबे दणाणले
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांनी अक्षरशः उसळी मारली असून, संख्या थेट 831 वर पोहचल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 844 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा
कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा त्याचा कहर सुरू केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बडे सेलिब्रिटी एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एअरटेल पेमेंट बँकेला
अनुसूचित बँकेचा दर्जा बहाल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एअरटेल पेमेंट बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा बहाल केला आहे. रिझर्व्ह बँक कायदा, 1954 अंतर्गत दुसऱ्या अनुसूचित एअरटेल पेमेंटचा समावेश करण्यात आला आहे. शेड्यूल्ड बँकांना व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला दर आठवड्याला द्यावी लागते. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँकेची अनुसूचित बँकावर नियंत्रण असते.
SD social media
98 5060 35 90