एकनाथ खडसे यांना पुन्हा धक्का, मुक्ताईनगर तालुक्यात युवकांनी हाती बांधले शिवबंधन

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा जळगावातील मुक्ताईनगरच्या स्थानिक आमदाराने धक्का दिला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या तरुण शेकडो युवकांनी आज स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.

चंद्रकांत निंबा पाटील हे शिवसेनेचा जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत. याआधी बोदवड नगरपंचायतीमध्ये एकनाथ खडसे यांना चंद्रकांत पाटील यांनी हादरा दिला होता. त्यापाठोपाठ हा खडसेंना दुसरा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत एकनाथ खडसेंचे वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी नांदत असली, तरी जळगावात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष जोरदार होताना दिसत आहे.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची निवडप्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात पडली, तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची निवड झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिल्याने आगामी काळातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. अत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने 17 पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिचिठ्ठीने एक जागा भाजपला मिळाली होती. तसेच राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर विजय मिळवता आला होता.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत
नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोदवडकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवणार आहे. बोदवडच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेसोबत आली आहे.

जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजप सेना सोबत राहील का? याबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे भाजपला विचारा, ते तयार असतील तर आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप सेनेची युती होऊन राजकीय समीकरणे बदलाचे संकेत मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.